'न भूतो' हिमवृष्टीने मॉस्को गारठले; एकाचा मृत्यु

वृत्तसंस्था
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

आज झालेली हिमवृष्टी मॉस्कोच्या इतिहासातील सर्वांत मोठी असल्याचे सांगितले जाते. यापूर्वी 1957 मध्ये 38 सेंटीमीटर बर्फ पडला होता. तीन दिवसांपासून होत असलेल्या बर्फवृष्टिमुळे एकाचा मृत्यू झाला. या व्यक्तिच्या अंगावर झाड पडल्याचे मॉस्कोचे महापौर सर्गई सोबियानिन यांनी सांगितले

मॉस्को - रशियाची राजधानी मॉस्कोत विक्रमी 43 सेंटीमीटर हिमवृष्टी झाल्याचे वृत्त आहे. यात एकाचा मृत्यू झाला तर पाचजण जखमी झाले.

मॉस्कोत शनिवारपासूनच (ता.3) थंड वाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी सुरू होती. यामुळे सामान्य जीवन विस्कळित झाले होते. आज झालेली हिमवृष्टी मॉस्कोच्या इतिहासातील सर्वांत मोठी असल्याचे सांगितले जाते. यापूर्वी 1957 मध्ये 38 सेंटीमीटर बर्फ पडला होता. तीन दिवसांपासून होत असलेल्या बर्फवृष्टिमुळे एकाचा मृत्यू झाला. या व्यक्तिच्या अंगावर झाड पडल्याचे मॉस्कोचे महापौर सर्गई सोबियानिन यांनी सांगितले.

शहरात दोन हजारपेक्षा जास्त झाडे पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हिमवृष्टीमुळे तीन हजार घरांमधील वीज पुरवठा खंडित झाला आहे. मंगळवारी (ता.6) मॉस्कोचे तापमान उणे 7 ते उणे 2 अंश सेल्सिअसदरम्यान असेल, असा अंदाज रशियाच्या हवामान विभागाने व्यक्त केला आहे. जास्त हिमवर्षाव झालेल्या भागात वाहतूक व्यवस्थापन सेवेला युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: moscow snowfall russia