म्यानमारमध्ये परिस्थिती चिघळली; गोळीबारात आणखी 8 आंदोलकांचा मृत्यू

टीम ई-सकाळ
Wednesday, 3 March 2021

म्यानमारमध्ये 1 फेब्रुवारीला झालेल्या लष्करी बंडानंतर सुरु झालेले आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिस अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत.

यांगून : म्यानमारमध्ये लष्करी राजवटीविरोधात नागरिकांनी सुरू केलेल्या आंदोलनात आज सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात 8 जण ठार झाले. येथील स्थानिक माध्यमांनी याबाबतची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून म्यानमारमध्ये लष्करी राजवटीविरोधात सुरू असलेले आंदोलन पोलिस आणि लष्कराच्या दबावामुळे आणखीनच तीव्र होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे म्यानमारमधील परिस्थिती चिघळत चालली आहे. 1 फेब्रुवारीला झालेल्या लष्करी बंडानंतर सुरु झालेले आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिस अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत. दुसऱ्या बाजूला यामुळे आंदोलनाची धार आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर पोलिसांच्या गोळीबाराचे तसेच अमानुष लाठिमाराचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे लष्कराविरोधातील रोष आणखी वाढत आहे.

आज काय घडले?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, म्यानमारमध्ये केवळ राजधानीत नव्हे तर, हे आंदोलन आता वेगवेगळ्या शहरांत आणि गावांमध्ये पोहोचले आहे. पोलिस आता जनतेविरोधात प्राणघातक शस्त्रांचा वापर करताना अधिक मोठ्या प्रमाणावर करताना दिसत आहेत. याशिवाय, रबरी गोळ्या आणि अश्रुधुराचा प्रचंड प्रमाणात वापर होत आहे. म्यानमारच्या मिनग्यान शहरात पोलिसांनी एका १४ वर्षाच्या मुलाला गोळी घालून ठार मारल्याचे वृत्त सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध झाले. दिवसभरात विविध ठिकाणी मिळून सहा जणांचा मृत्यू झाला. आंदोलनादरम्यान हिंसाचार वाढल्याने राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.

जगभरातील इतर घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महिनाभरात घडले?
म्यानमारमध्ये आंग सांग सू की यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बाजूला करून, लष्कराने सत्तेवर ताबा घेतला आहे. त्यानंतर म्यानमारमध्ये हळू हळू लष्कराविरोधात आंदोलन पेटले. याचे लोण देशभर पसरले. गेल्या रविवारीही तेथे आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला होता. जागातील मानवाधिकार संघटनांच्या दाव्यानुसार, त्या गोळीबारात 18 जणांचा मृत्यू झाला होता. आज, आणखी 8 आंदोलकांचा बळी गेला आहे. त्यात एका 14 वर्षीय मुलाचाही समावेश असल्याची माहिती आहे.

देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

काय घडणार?
म्यानमानमधील परिस्थितीवर जागतिक पातळीवरही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने तेथील परिस्थितीची दखल घेतली असून, येत्या शुक्रवारी (5 मार्च) या संदर्भात महत्त्वाची बैठक घेण्यात येणार आहे. ब्रिटनने या बैठकीची मागणी संयुक्त राष्ट्रांकडे केली होती. म्यानमारवर निर्बंध लादण्याची मागणी होत असली तरी सुरक्षा परिषदेतील चीन आणि रशिया या दोन देशांचा याला विरोध होण्याची दाट शक्यता आहे. काही देश मात्र वैयक्तिक पातळीवर निर्बंध लागू करण्याचा विचार करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Myanmar protest security forces shoot dead 8