Narendra Modi : फ्रान्समध्ये मोदींचे जंगी स्वागत; ‘बॅस्टिल डे’ संचलनाला राहणार उपस्थित

फ्रान्सच्या ऐतिहासिक दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज पॅरिसमध्ये जंगी स्वागत करण्यात आले.
Narendra Modi
Narendra ModiSakal

पॅरिस - फ्रान्सच्या ऐतिहासिक दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज पॅरिसमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. या दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी हे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा करणार असून फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.

या दौऱ्यामध्ये ते तेथील स्थानिक भारतीय समुदायाशी देखील संवाद साधतील. येथील विमानतळावर आगमन होताच फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांना मानवंदना देण्यात आली तसेच दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताचे गायनही करण्यात आले.

फ्रान्स दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी मोदी यांनी द्विपक्षीय रणनीतीक भागीदारी यामुळे अधिक भक्कम होईल असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांनी रात्री उशिरा फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांच्याशी चर्चा केली तसेच फ्रेंच सिनेटचे अध्यक्ष गेरार्ड लार्चर यांच्याशीही त्यांनी संवाद साधला.

‘बॅस्टिल डे’ संचलनामध्ये मोदी सहभागी होणार असून येथे त्यांना मानवंदना देण्यात येईल. भारतीय हवाई दलाची तीन राफेल विमाने यावेळी चित्तथरारक प्रात्याक्षिके सादर करतील. तत्पूर्वी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन हे २०२२ मध्ये भारत दौऱ्यावर आले होते, त्यानंतरही अनेकदा त्यांची मोदींशी भेट झाली होती.

हे दोन्ही नेते यंदा जपानमधील हिरोशिमा येथे ‘जी-७’ देशांच्या संमेलनाच्या निमित्ताने एकत्र आले होते. या दौऱ्यामध्ये मोदी हे विविध कंपन्यांच्या ‘सीईओं’शी देखील संवाद साधतील. फ्रान्सचा दौरा संपल्यानंतर ते शनिवारी (ता.१५) संयुक्त अरब अमिरातीला रवाना होतील.

मणिपूरबाबतचा ठराव मंजूर

स्ट्रॉसबर्ग - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्याला सुरूवात झाली असतानाच आज युरोपीय संसदेने मणिपूरमधील हिंसाचाराची दखल घेतानाच याबाबत एक ठराव मंजूर केला असून हा हिंसाचार रोखण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना आखाव्यात असे आवाहन या माध्यमातून करण्यात आले आहे. मणिपूरमधील धार्मिक अल्पसंख्याक विशेषतः ख्रिश्चनांच्या संरक्षणाकडे लक्ष द्यावे, असे या ठरावात नमूद करण्यात आले आहेत. पाच राजकीय पक्षांनी याबाबतचा ठराव सादर केला होता.

आम्ही पाहिले आहे की, युरोपीय संसदेने मणिपूरमधील घडामोडींवर चर्चा केली आणि तथाकथित ठराव तत्काळ स्वीकारला. हा प्रकार भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये दखल देणारा असून यातून युरोपीय महासंघाची वसाहतवादी मानसिकता दिसते. न्यायपालिका, प्रशासकीय यंत्रणा मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पावले टाकत आहेत. युरोपीय संसदेला सल्ला आहे की, त्यांनी आपला वेळ अंतर्गत समस्या मार्गी लावण्यासाठी उत्पादकपणे वापरावा.

- अरिंदम बागची, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते

पाणबुड्या, विमाने खरेदीला मान्यता

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण सामग्री अधिग्रहण परिषदेने तीन स्कॉर्पिन श्रेणीतील पाणबुड्या आणि युद्धनौकांसाठी २६ राफेल लढाऊ विमाने खरेदीच्या प्रस्तावाला आज संमती दिली. यामुळे आता पंतप्रधानांच्या फ्रान्स दौऱ्यामध्ये पाणबुड्या आणि लढाऊ विमाने खरेदीचा करार मार्गी लागू शकतो.

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण सामग्री अधिग्रहण परिषदेच्या (डीएसी) बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. यात नौदलासाठी २६ राफेल सागरी लढाऊ विमानांच्या खरेदीला तसेच तीन स्कॉर्पिन श्रेणीतील पाणबुड्यांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली.

पंतप्रधानांच्या दौऱ्यात या करारावर शिक्कामोर्तब झाल्यास स्कॉर्पिन श्रेणीतील पाणबुड्यांची निर्मिती ‘माझगाव डॉक शिप बिल्डर’ आणि फ्रान्सचा ‘नेव्हल ग्रुप’ यांचा संयुक्त उपक्रम असेल. स्वदेशी सामग्रीचा जास्त उपयोग करणाऱ्या या अतिरिक्त पाणबुड्यांच्या खरेदीमुळे भारतीय नौदलाची ताकद वाढेल.

दरम्यान, फ्रान्सकडून अपेक्षित असलेल्या २६ राफेल लढाऊ विमानांपैकी यातील चार द्विआसनी व प्रशिक्षणासाठी उपयुक्त लढाऊ विमाने आहेत तर उर्वरित २२ लढाऊ विमाने आहेत. फ्रेंच कंपनी दसॉल्ट एव्हिएशनकडून या विमानांची खरेदी होऊ शकते. याआधी २०१५ मध्ये भारताने फ्रान्सकडून ४.२४ अब्ज डॉलर किमतीची ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदीची घोषणा केली होती.

मोदी ठरले दुसरे पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समधील प्रतिष्ठित बॅस्टिल डे संचलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रवाना झाले आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण मिळालेले मोदी हे दुसरे भारतीय पंतप्रधान आहेत.

याआधी २००९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग या कार्यक्रमात सहभागी झाले होते. संरक्षण साहित्य खरेदीसाठी फ्रान्सची उपयुक्तता लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात द्विपक्षीय संबंध बळकट करण्याबरोबरच संरक्षण सहकार्य वृद्धींगत करण्यावर भारताचा भर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com