भूतकाळाचा तुकडा उचलला; ‘नासा’च्या ओसायरिस-रेक्स यानाने केला लघुग्रहाला स्पर्श

पीटीआय
Thursday, 22 October 2020

आजच्या ‘टच अँड गो’ या मोहिमेमध्ये अवकाशयानाने गोळा केलेले नमुने पुरेसे असल्याचे आढळून आल्यास शास्त्रज्ञ या यानाला मार्च २०२१ पासून परतीच्या प्रवासाला सुरुवात करण्याची ‘कमांड’ देतील.

वॉशिंग्टन - अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने आज इतिहास घडविला. त्यांनी सोडलेल्या अवकाशयानाने ‘बेन्नू’ या लघुग्रहाला भारतीय प्रमाण वेळेनुसार बुधवारी पहाटे अडीच वाजता स्पर्श करत आपल्या सौरमालेच्याही जन्माआधीपासून अस्तित्वात असलेल्या खड्यांचे नमुने गोळा केले. अवकाशयानाने गोळा केलेले हे नमुने २०२३ मध्ये पृथ्वीवर येतील. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बेन्नू हा लघुग्रह पृथ्वीपासून ३२ कोटी १० लाख किलोमीटर अंतरावर आहे. ‘नासा’च्या ‘ओसिरिस-रेक्स’ (द ओसायरिस, स्पेक्ट्रल इंटरप्रिटेशन, रिसोर्स आयडेंटीफिकेशन, सिक्युरिटी, रिगोलिथ एक्सप्लोअरर) या अवकाशयानाने धूळ आणि खड्यांचे नमुने गोळा करण्यासाठी आपल्या यांत्रिक हाताच्या मदतीने लघुग्रहाला १६ सेकंद इतक्या अल्पकाळ स्पर्श केला. या नमुन्यांद्वारे अब्जावधी वर्षांपूर्वी सौरमालेची निर्मिती होतानाच्या परिस्थितीचा अभ्यास करण्याची संधी शास्त्रज्ञांना मिळणार आहे. पृथ्वीच्या निर्मितीचे रहस्यही कदाचित याद्वारे उलगडण्याची त्यांना आशा आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नाहीतर पुन्हा एकदा जानेवारीत..
आजच्या ‘टच अँड गो’ या मोहिमेमध्ये अवकाशयानाने गोळा केलेले नमुने पुरेसे असल्याचे आढळून आल्यास शास्त्रज्ञ या यानाला मार्च २०२१ पासून परतीच्या प्रवासाला सुरुवात करण्याची ‘कमांड’ देतील. मात्र, हे नमुने पुरेसे, म्हणजे साधारण दोन किलोपर्यंत नसले तर पुढील वर्षी जानेवारीमध्ये पुन्हा एकदा नमुने गोळा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

असा केला स्पर्श
ओसायरिस-रेक्सने ‘बेन्नू’च्या कक्षेत प्रवेश करण्यासाठी सुरुवातीला थ्रस्टर्स सुरु केले. यानंतर क्रमाक्रमाने आपल्या ३.३५ मीटर लांबीच्या यांत्रिक हाताचा खांदा, मग कोपर आणि नंतर मनगट बाहेर काढले. लघुग्रहाच्या जवळ येण्यासाठी यान चार तासांमध्ये ८०५ मीटर पृष्ठभागाच्या दिशेने खाली आले. पृष्ठभागापासून १२५ मीटर अंतरावर असताना यानाने ‘चेकपॉइंट बर्न’ करताना नमुने गोळा करण्यासाठी ठरविण्यात आलेल्या जागेच्या दिशेने अचूक वाटचाल सुरु केली. लघुग्रहाच्या उत्तर ध्रुवावर असलेल्या या जागेला ‘नाइटिंगल’ असे नाव देण्यात आले होते. दहा मिनीटांनंतर यानाने ‘मॅचपॉइंट बर्न’साठी दुसऱ्यांदा थ्रस्टर्स सुरु करत आपला वेग कमी केला आणि उल्कापिंडाच्या वेगाशी आपला वेग जुळवून घेतला. यानंतर अकरा मिनीटांमध्ये सुमारे दोन मजली इमारतीच्या उंचीएवढा उंच खडक पार कापण्यासाठी ‘माऊंट डाऊन’ सुरु केले आणि या खडकांनी भरलेल्या या लघुग्रहावरील तुलनेने सपाट असलेल्या ‘नाइटिंगल’ला स्पर्श करत नमुने गोळा केले. 

‘ओसायरिस-रेक्स’बाबत
हे अवकाशयान ‘नासा’ने २०१६ मधील सप्टेंबर महिन्यात केले होते. सुमारे दोन वर्ष अवकाशप्रवास केल्यावर हे यान ऑगस्ट २०१८ मध्ये बेन्नू लघुग्रहाच्या कक्षेत पोहोचले. नंतरची दोन वर्षे लघुग्रहाभोवतीच फेऱ्या मारत यानाने त्याचा अभ्यास करण्याबरोबर नकाशाही तयार केला. अर्धा किलोमीटर व्यासाच्या बेन्नू या उपग्रहावर कार्बनचे प्रमाण अधिक असून सौरमालेच्या जन्माआधीपासून त्याचे अस्तित्व आहे. या लघुग्रहाचा पृथ्वीला धोका असल्याचेही काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

हे अप्रतिम यश आहे. आज विज्ञान आणि अभियांत्रिकी या दोन्ही शाखांचे यश आहे. 
- थॉमस झुर्बकन,  ‘नासा’चे अधिकारी 

अत्यंत प्रतिभावान तज्ज्ञांच्या मदतीने कल्पनातीत आव्हानांचा सामना करत ज्ञानाची कक्षा रुंदावण्याची आपली क्षमता ‘नासा’ने पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या मोहिमेमुळे प्राचीन सौरमालेचा एक तुकडा आपल्या हातात पकडण्याची संधी मनुष्याला मिळणार आहे. 
- जिम ब्रायडनस्टाइन, ‘नासा’चे प्रशासक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NASA Osiris-Rex spacecraft touches asteroid