
उपदेशपर भाषणांची गरज नाही; चीनने मिशेल बॅशलेट यांना सुनावले
बीजिंग : ‘मानवाधिकार संरक्षणात कोणताही देश संपूर्ण यशस्वी नाही आणि कोणी याबाबत उपदेशपर भाषण देण्याची गरजही नाही,’ या शब्दांत चीनने संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेच्या उच्चायुक्त मिशेल बॅशलेट यांना सुनावले. चीनच्या शिनजिआंग प्रांतात उईगर मुस्लिमांच्या मानवाधिकारांचा भंग होत असल्याच्या आरोपांकडेही चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दुर्लक्ष केले. मिशेल बॅशलेट या सध्या चीन दौऱ्यावर आहेत. शिनजिआंग प्रांतात उईगर मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचा आणि त्या समुदायातील अनेकांना डांबून ठेवल्याचा चीन सरकारवर आरोप आहे. त्या पार्श्वभूमीवर बॅशलेट यांचा चीन दौरा आयोजित आहे.
उईगर मुस्लिमांवरील अत्याचारांची चौकशी करणे हा त्यांच्या दौऱ्याचा उद्देश आहे. बॅशलेट आणि जिनपिंग यांच्यात आज व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून चर्चा झाली. यावेळी जिनपिंग यांनी चीनमधील मानवाधिकारांच्या विकासाबाबतची स्थिती बॅशलेट यांना सांगितली आणि मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी चीन सरकार आणि चिनी कम्युनिस्ट पक्ष कटिबद्ध असल्याचाही दावा केला.
यावेळी जिनपिंग म्हणाले की,‘‘मानवी हक्कांच्या संरक्षणात कोणीही पूर्णपणे यशस्वी ठरलेले नाही, प्रत्येकाला कायमच सुधारण्याची संधी असते. त्यामुळे कोणालाही उपदेशपर भाषण देण्याची गरज नाही.’’
अल कायदा आणि इसिसशी संबंधित असलेली ईस्ट तुर्कस्तान इस्लामिक मूव्हमेंट ही संघटना शिनजिआंग प्रांतात सक्रीय असल्याने येथे कडक धोरण अवलंबिले जात असल्याचे चीनचे म्हणणे आहे. तसेच, उईगर मुस्लिमांच्या छावण्या बनवून त्यांना योग्य शिक्षण दिले जात असल्याचा दावाही चीनने केला आहे.
मानवाधिकारांच्या उल्लंघनांचे राजकारण होता कामा नये आणि त्याबाबत दुटप्पी धोरण अवलंबिता कामा नये. त्याचा वापर करून इतर देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेपही केला जाऊ नये.
- शी जिनपिंग, अध्यक्ष, चीन
Web Title: No Country Is Completely Successful In Protecting Human Rights And No One Needs To Give Sermon On It China Xi Jinping Michelle Bachelet
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..