"कोरोनाला रोखण्यासाठी किम जोंग उनचा पाहताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश"

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 11 September 2020

कोरोना महामारीचा संसर्ग सुरु झाल्यापासून उत्तर कोरियातील आरोग्य व्यवस्था विषाणूला हाताळण्यात कमी पडत आहे.

वॉशिंग्टन- उत्तर कोरिया सरकारने कोरोना महामारीला रोखण्यासाठी चीनमधून देशात येणाऱ्यांना पाहताच क्षणी गोळ्या घालण्याचा आदेश काढला असल्याचा दावा दक्षिण कोरियातील अमेरिकेचे कमांडर रॉबर्ट अब्रम यांना केला आहे. 

कोरोना महामारीचा संसर्ग सुरु झाल्यापासून उत्तर कोरियातील आरोग्य व्यवस्था विषाणूला हाताळण्यात कमी पडत आहे. असे असले तरी उत्तर कोरिया सरकारने देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या जाहीर केलेली नाही. उत्तर कोरियाने चीनसोबत लागू असलेल्या सीमा जानेवारी महिन्यापासून बंद केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव देशात होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. शिवाय देशात आणीबाणी लागू करण्यात आल्याचंही कळतंय.  

सीमा बंद करण्यात आल्याने स्मगलिंग केलेल्या वस्तूंची मागणी वाढली आहे. त्यामुळे यात सरकारने हस्तक्षेप केला असल्याचं अमेरिकेचे सैन्याचे दक्षिण कोरियातील कमांडर रॉबर्ट अब्रम म्हणाले. उत्तर कोरिया सध्या संकटातून जात आहे. कोरियाने चीनच्या सीमेपासून एक ते दोन किलोमीटरचा बफर झोन विकसित केला आहे. कोरिया सरकारने  (Special Operations Forces) पाहताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश आपल्या सैन्याला दिले आहेत, असं ते म्हणाले. ते एका ऑनलाईन परिषदेच्या कार्यक्रमात बोलत होते. 

हद्दीत आलात तर बघून घेऊ; चीनला या छोट्या देशाची धमकी!

न्यूक्लिअर कार्यक्रमाच्या मुद्द्यावरुन उत्तर कोरियावर अमेरिकेकडून निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे, कोरिया ८५ टक्के आयात चीनकडून करतो. जगापासून विलग झालेला उत्तर कोरिया सध्या अडचणीत आहे. त्यातच Typhoon Maysak आलेल्या चक्रिवादळामुळे देशाची वाताहत झाली आहे. २००० पेक्षा अधिक घरांना या वादळाने उद्धवस्त केले आहे. त्यामुळे येत्या काळात उत्तर कोरियाकडून काही आगळीक होणार नाही, असा दावा रॉबर्ट यांनी केलाय. 

उत्तर कोरियाने आपल्या सैनिकांना कोरोना महामारीविरोधात लढण्याच्या कामाला लावले आहे. त्यामुळे सध्या तरी तो देश कोणाला चिथावणी देण्याच्या भानगडीत पडणार नाही. मात्र, लवकरच किंम जोंग उन यांच्या पक्षाचा ७५ वा वर्धापनदिन येणार आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर कोरिया नव्या शस्त्रांना समोर आणू शकतो, असंही रॉबर्ट म्हणाले. 

दरम्यान, गेल्या वर्षी उत्तर कोरिया आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये ऐतिहासिक भेट झाली होती. उत्तर कोरियाने अमेरिकेसोबत अण्वस्त्र नष्ट करण्याबाबत करार केला आहे. पण, उत्तर कोरिया याबाबत पुढे जाताना दिसत नाही. शिवाय सॅटेलाईट फोटोंमध्ये उत्तर कोरिया बॅलेस्टिक मीसाईल लॉन्च करण्याची तयारी करत असल्याचं दिसून आलं आहे. 

(edited by- kartik pujari)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: North Korea Issues Shoot-To-Kill Orders To Prevent Coronavirus