आम्ही सदैव चर्चेस तयार!

वृत्तसंस्था
शनिवार, 26 मे 2018

ट्रम्प यांच्या निर्णयानंतर उत्तर कोरियाची प्रतिक्रिया

सोल: सिंगापुरात 12 जून रोजी होणारी बैठक तडकाफडकी रद्द करण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला असला, तरी अमेरिकेबरोबर चर्चेस आम्ही सदैव तयार आहोत, असे उत्तर कोरियाकडून आज स्पष्ट करण्यात आले.

ट्रम्प यांच्या निर्णयानंतर उत्तर कोरियाची प्रतिक्रिया

सोल: सिंगापुरात 12 जून रोजी होणारी बैठक तडकाफडकी रद्द करण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला असला, तरी अमेरिकेबरोबर चर्चेस आम्ही सदैव तयार आहोत, असे उत्तर कोरियाकडून आज स्पष्ट करण्यात आले.

ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्यातील आगामी बैठक सिंगापूर येथे 12 जून रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी अचानकपणे ट्रम्प यांनी ही बैठक रद्द करण्याची एकतर्फी घोषणा केली होती. ही बैठक रद्द करण्यासाठी उत्तर कोरियाच जबाबदार असल्याचा आरोप ट्रम्प यांनी किम यांना पाठविलेल्या पत्रात केला होता. तसेच, कुठलेही मूर्खपणाचे कृत्य केल्यास त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला होता.

ट्रम्प यांचा हा निर्णय अनपेक्षित आणि धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया उत्तर कोरियाचे उपपरराष्ट्रमंत्री किम क्‍ये ग्वान यांनी व्यक्त केली होती. मात्र, चर्चेसाठी अद्यापही दरवाजे उघडे असल्याचे त्यांनी म्हटले होते. अमेरिकेबरोबर चर्चा करण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत, असे ग्वान यांनी स्पष्ट केले होते.

ट्रम्प यांनी आपल्या पत्रात उत्तर कोरियावर आरोप केले होते; मात्र पुढील काळात दोन्ही देशांच्या दरम्यान चर्चा होऊ शकते असे म्हटले होते. असे असले तरी भविष्यात चर्चा होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

सिंगापुरातील बैठक रद्द करण्याची घोषणा ट्रम्प यांनी करण्यापूर्वीच आपल्या देशाने अण्विक चाचण्या घेण्याची केंद्रे संपूर्णपणे नष्ट केली असल्याचे उत्तर कोरियाने स्पष्ट केले होते. दरम्यान, जपान, चीन, दक्षिण कोरिया आदी देशांबरोबरच संयुक्त राष्ट्रांनीही (यूएन) अमेरिका आणि उत्तर कोरियाने चर्चेबाबत सकारात्मक विचार करण्याचा सल्ला दिला आहे.

किम जोंग उन हे कमजोर नेते नाहीत. उत्तर कोरियाचे नेतृत्व करण्याची त्यांची क्षमता वाखाणण्याजोगी आहे. दोन्ही देशांच्या दरम्यान संवाद कायम ठेवण्यात येईल. दोन्ही देशांच्या दरम्यान भविष्यात चर्चा होऊ शकते, याबाबत मी सकारात्मक आहे.
- माईक पोम्पिओ, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: North Koreas reaction after donald trumps statement