चीनमधील कोरोनाच्या बळींची संख्या दोन हजारांच्या वर

पीटीआय
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा कहर सुरूच असून, या रोगाची लागण झालेल्यांची संख्या 74 हजार 185 वर पोचली आहे.

बीजिंग - चीनमध्ये कोरोना व्हायरसचा कहर सुरूच असून, या रोगाची लागण झालेल्यांची संख्या 74 हजार 185 वर पोचली आहे. बुधवारी 136 जणांचा मृत्यू झाल्यामुळे चीनमधील कोरोनाच्या बळींची संख्या दोन हजारांच्या वर गेली असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दैनंदिन वार्तालापास स्पष्ट केले की, कोरोनामुळे बुधवारी 136 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 2,004 झाली आहे. एक हजार 749 जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली आहे. 

कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या हुबेई प्रांतात बुधवारी 132 जणांचा मृत्यू झाला, तर इतर तीन प्रांतात प्रत्येकी एका जणाचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. कोरोनाची लागण झाल्याचा संशय असलेले 1,185 रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी 236 रुग्णांची प्रकृती गंभीर बनली होती. 

दरम्यान, मंगळवारी पहिल्यांदाच दिवसभरात लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येहून अधिक रुग्णांना प्रकृतीत सुधारणा झाल्याने घरी सोडण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रकृतीत सुधारणा झालेल्या 1,824 रुग्णांना मंगळवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत रुग्णालयातून घरी सोडलेल्या रुग्णांची संख्या 14,376 वर पोचली असल्याचे चीन सरकारकडून सांगण्यात आले.

‘डायमंड प्रिन्सेस’वरील पाचशे जणांची मुक्तता
योकोहामा ः
चीनमध्ये दोन हजारांहून अधिक जणांचे बळी घेणाऱ्या कोरोना व्हायरसची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सुमारे 500 प्रवाशांनी आज डायमंड प्रिन्सेस या जपानी बंदरात उभ्या असलेल्या क्रूझ जहाजाचा निरोप घेतला. या प्रवाशांचे अहवाल नकारात्मक आल्यामुळे त्यांना जहाजातून मुक्त करण्यात आले. या जहाजावर कोरोनाची लागण झालेले 542 रुग्ण आहेत. जहाजातून बाहेर पडल्यानंतर आम्ही सुटकेचा निःश्वास टाकल्याची प्रतिक्रिया मुक्त झालेल्या प्रवाशांनी व्यक्त केली. 

चिनी नागरिकांना रशियात प्रवेशबंदी
मॉस्को - चीनला लागून असलेल्या सीमेवरून चीनमधून येणाऱ्या सर्व नागरिकांना 20 फेब्रुवारीपासून रशियात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. रशियाने यापूर्वीच चीनला लागून असलेली 4,250 किमीची सीमा सील केली आहे.

चीनमध्ये कोरोनाचा झालेला उद्रेक हा अतिशय गंभीर असून, या साथीच्या रोगाची व्याप्ती वाढू शकते. हुबेई प्रांताच्या बाहेर या रोगाची लागण झालेल्यांची संख्या अतिशय कमी आहे.
- मायकेल रिअन, डब्लूएचओच्या आरोग्य आणीबाणी प्रकल्पाचे प्रमुख 

एकूण ७४ हजार जणांना लागण
    एकूण 11,977 जणांची प्रकृती गंभीर
    प्रकृतीत सुधारणा झालेल्या 1824 जणांना मंगळवारी घरी सोडले
    आतापर्यंत रुग्णालयातून घरी सोडलेल्या रुग्णांची संख्या 14,376
    लागण झालेल्यांची एकूण संख्या 74185
    मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 2004
    हॉंगकॉंगमध्ये एकाचा मृत्यू; 62 नवे रुग्ण 
    मकाऊमध्ये नवे 10 रुग्ण आढळले
    तैवानमध्ये एकाचा मृत्यू; 22 नवे रुग्ण

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of Corona victims in China is over two thousand

टॅग्स
टॉपिकस