‘ओमिक्रॉन’मुळे अमेरिकेतील विमानसेवा ठप्प

वैमानिक आजारपणाच्या रजेवर गेल्‍याने उड्डाणे स्थगित; नाताळात प्रवाशांची गैरसोय
Airplane
Airplane sakal media

वॉशिंग्टन : कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन (Corona Omicron Variant) या नव्या प्रकाराचा संसर्ग विमान कंपन्यांच्या (Airplane Company) कर्मचाऱ्यांना झाल्याची भीती असल्याने लुफ्तान्सा, डेल्टा आणि युनायटेड या प्रमुख तीन विमान कंपन्यांनी अनेक उड्डाणे रद्द केली आहेत. त्यामुळे नाताळाच्या सुटीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होत आहे.

जर्मनीताल लुफ्तान्सा कंपनीने शुक्रवारी सांगितले की, अनेक वैमानिक आजारपणाच्या रजेवर गेल्याने सध्या अटलांटिक महासागरापलीकडील लांब पल्ल्याची विमान सेवा रद्द करण्यात आली आहेत. अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध केले असले तरी ह्यूस्टन बोस्टन आणि वॉशिंग्टनची विमान उड्डाणे बंद ठेवावी लागली आहेत. सुटीचा हंगाम असल्याने मोठ्या प्रमाणावर जादा कर्मचारी नियुक्त केले असले तरी अनेक जण आजारी असल्याचे कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. वैमानिकांच्या रजेमागे कोरोनाचा संसर्ग किंवा विलगीकरणाचे कारण आहे, हे निश्‍चितपणे सांगता येणार नाही. कोणता आजार झाला हे त्यांनी स्पष्टपणे कळविले नसल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Airplane
पुणे : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात २६५ नवे कोरोना रुग्ण

ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे कर्मचाऱ्यांची संख्या घटल्याने नाताळाआधी अनेक विमाने रद्द केली असल्याचे अमेरिकेच्या डेल्टा एअरलाईन्स आणि युनायटेड एअरलाईन्स या कंपन्यांनी सांगितले. देशभरात ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्याचा थेट परिणाम आमच्या विमान कर्मचाऱ्यांवर आणि त्यासंबंधित लोकांवर झाला आहे. त्यामुळे १०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्याची वेळ आमच्यावर आली आहे.

याची माहिती प्रवाशांना विमानतळावर येण्याच्या आधीच देण्यात आले आहे, अशी माहिती युनायटेड’ने दिली. नियोजित उड्‍डाणांसाठी मार्गबदल, अतिरिक्त विमाने व कर्मचारी तैनात करण्यात येऊनही ओमिक्रॉन आणि खराब हवामानामुळे डेल्टा कंपनीने काल ९० पेक्षा जास्त विमाने रद्द केली.

जर्मनीत ओमिक्रॉनच्या लाटेची भीती

बर्लिन : आगामी काळात ओमिक्रॉनच्या संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो, अशी भीती जर्मनीचे आरोग्य मंत्री कार्ल लॉटेबाक यांनी शुक्रवारी व्यक्त केली. देशात डेल्टा प्रकाराचे रुग्ण कमी होत असले तरी ओमिक्रॉनमुळे जर्मनीत कोरोनाची आणखी एक लाट येऊ शकते, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. सध्या सुट्यांमुळे स्थानिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी मिळण्यास विलंब होत आहे. मात्र रोजच्या घडामोडींकडे आमचे लक्ष आहे.

लसीकरण झालेल्या नागरिकांनीही चाचण्या करून घ्याव्यात, असे आवाहन लॉटेबाक यांनी केले. ‘‘नाताळाच्या सणात कमी संपर्क ठेवणे अवघड आहे, याची मला कल्पना आहे, पण आपण सर्व एकत्र आलो आणि लसीकरण पूर्ण केले तर या संकटातून आपण निश्‍चित बाहेर पडू, असा विश्‍वास जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ स्कोल्झ यांनी ट्विटमधून व्यक्त केला. ओमिक्रॉनमुळे जर्मनीत नवे निर्बंध घालण्यात येत असून अनेक ठिकाणी नाइटक्लब बंद ठेवले आहेत.

विलगीकरणाचा कालावधी कमी

ओमिक्रॉनची लागण झाल्याने अनेक विमान कंपन्यांचे वैमानिक, अन्य कर्मचारी आजारी आहेत. अशीच स्थिती पोलिस विभाग, सुपरमार्केट आणि अन्य तातडीच्या सेवांमधील असून सेवा सुरळीत ठेवण्यासाठी ओढाताण होत आहे. कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यावर उपाय म्हणून स्पेन आणि ब्रिटन या देशांनी कोरोनाच्या विलगीकरणाचा कालावधी कमी केला आहे. कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या आणि विषाणूबाधितांच्या संपर्कात आलेल्यांना लवकर कामावर रुजू होण्यास परवानगी दिली आहे.

Airplane
किरकटवाडी : डोणज्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार

अमेरिकेतील परिस्थिती

  • नौदलाची ‘यूएसएस मिलवाउकी’ या युद्धनौकेवर कोरोनाचा शिरकाव

  • कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याने युद्धनौका दक्षिण अमेरिकेत तैनात करण्याचा निर्णय लांबला

  • ओमिक्रॉनचा प्रसार झाल्याने दक्षिण आफ्रिकेतील ज्या आठ देशांवर अमेरिकेने वाहतूक बंदी घातली होती, ती आता मागे घेण्याची घोषणा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com