
OpenAI कंपनीत वादळ! 500 कर्मचारी राजीनामा देण्याच्या तयारीत
नवी दिल्ली- OpenAI च्या कर्मचाऱ्यांनी राजीनामा देण्याचा इशारा कंपनीला दिला आहे. OpenAI चे माजी सीईओ सॅम अल्टमन हे मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू होणार आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी सॅम अल्टमनच्या नव्या चमुमध्ये सहभागी होण्याचा इशारा दिलाय. संचालक बोर्डाने पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. (Over 500 employees of OpenAI threatened to leave the company unless all current board members resigned)
रॉयटर्सने यासंदर्भातील पत्र शेअर केलं आहे. ७०० पैकी ५०५ कर्मचाऱ्यांनी पत्र लिहिलं असून त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. यात प्रमुख तंत्रज्ञान अधिकारी मिरा मुर्ती, प्रमुख डेटा वैज्ञानिक इल्या सुतस्केवर (Ilya Sutskever), कार्यकारी अधिकारी ब्रड लाईटकॅप यांचा समावेश आहे. सध्याच्या संचालक बोर्डाने राजीनामा द्यावा ही त्यांनी प्रमुख मागणी आहे.
ज्या पद्धतीने सॅम अल्टमन यांची सेवा समाप्त करण्यात आली आणि ज्या पद्धतीने ग्रेग ब्रोकमन यांना काढण्यात आले ते चुकीचे होते. यामुळे आतापर्यंत केलेले काम आणि कंपनीचे आतापर्यंत असणारे उद्दिष्टे धुळीस मिळाले आहेत. तुमच्या कार्यवाहीवरुन स्पष्ट होतंय की, तुम्ही कंपनी सांभाळण्यास सक्षम नाही, असं पत्रामध्ये म्हणण्यात आलंय.
एका दिवसापूर्वी कंपनीने अल्टमन यांची सेवा समाप्त केली होती. त्यानंतर Twitch चे सहसंस्थापक एमेट शेअर ( Emmett Shear) यांची नवे हंगामी मुख्य सीईओ म्हणून निवड करण्यात आली. OpenAI ने घेतलेल्या निर्णयामुळे मोठ्या वादाला तोंड फुटले होते.
मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी अल्टमन आणि त्यांचे सहकारी ग्रेग ब्रोकमन यांना त्यांच्या कंपनीमध्ये घेतल्याचे जाहीर केले होते. मायक्रोसॉफ्टमधील एआय संशोधन टीममध्ये त्यांना समावेश करण्यात येईल, असं नडेला म्हणाले होते. (Latest Marathi News)