esakal | पाकिस्तानात १२ दहशतवादी संघटनांची पाळेमुळे; भारत निम्म्यांच्या रडारवर - CRS रिपोर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Terrorism

पाकिस्तानात वाढणाऱ्या लष्करे तय्यबा, जैशे महंमदसह पाच कट्टर दहशतवादी संघटनांच्या रडारवर भारत असल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानात १२ दहशतवादी संघटनांची पाळेमुळे; भारत निम्म्यांच्या रडारवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन - पाकिस्तान दहशतवाद्यांचे नंदनवन असल्याचे भारताकडून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सातत्याने सांगितले जात असताना अमेरिकेच्या कॉंग्रेसनल रिसर्च सर्व्हिस (सीआरएस)च्या अहवालाने भारताच्या दाव्याला आणखी पुष्टी मिळाली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल १२ दहशतवादी संघटनांची पाळेमुळे पाकिस्तानात रुजली आहेत. पाकिस्तानात वाढणाऱ्या लष्करे तय्यबा, जैशे महंमदसह पाच कट्टर दहशतवादी संघटनांच्या रडारवर भारत असल्याचे म्हटले आहे.

स्वतंत्रपणे काम करणाऱ्या सीआरएसच्या अहवालात म्हटले की, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील पाकिस्तान हे दहशतवादी संघटनांचे आश्रयस्थान असल्याचे मान्य केले आहे. यापैकी काही संघटना १९८० च्या दशकापासून सक्रिय आहेत. क्वाड शिखर परिषदेच्या निमित्ताने अमेरिकी कॉंग्रेसची द्विपक्षीय विभागाने तयार केलेल्या अहवालात म्हटले की, पाकिस्तानातून दहशतवादी संघटनांचे संचालन होते. या दहशतवादी संघटनांची पाच श्रेणीत विभागणी करता येऊ शकते. यात जागतिक स्तरावरच्या दहशतवादी संघटना, अफगाणिस्तान केंद्रित संघटना, भारत आणि काश्‍मीर केंद्रित संघटना, अंतर्गत सक्रिय संघटना आणि धार्मिक (शियाविरुद्ध) दहशतवादी संघटनांचा समावेश आहे.

हेही वाचा: पाकिस्तानमध्ये बेरोजगारीचा कळस; शिपायाच्या एका पदासाठी १५ लाख अर्ज

लष्करे तय्यबा: लष्करे तय्यबाची स्थापना १९८० च्या दशकात झाली. २००१ रोजी या संघटनेला विदेश दहशतवादी संघटनेच्या यादीत समाविष्ट केले. सीआरएसने म्हटले की, २००८ रोजीचा मुंबईवरील दहशतवादी हल्ला यासह अनेक घातपाती कारवाया आणि हल्ल्यासाठी लष्करे तय्यबाला जबाबदार धरले आहे.

जैशे महंमद: जैशे महंमदची स्थापना २००० मध्ये दहशतवादी मसूद अझहरने केली. २००१ मध्ये याही संघटनेला विदेशी दहशतवादी संघटनेच्या सूचीत सामील केले. लष्करे तय्यबाबरोबरच जैशे महंमदला देखील २००१ च्या भारतीय संसदेवरील हल्ल्यांसह अनेक हल्ल्याला जबाबदार धरले आहे.

हरकत उल जिहादी इस्लामी (हुजी): या संघटनेची स्थापना १९८० च्या दशकात अफगाणिस्तानात तत्कालीन सोव्हिएत सैनिकांशी लढण्यासाठी केली होती. २०१० रोजी या संघटनेचा विदेशी दहशतवादी संघटनांत समावेश केला. १९८९ नंतर या संघटनेने भारताकडे लक्ष केंद्रित केले. त्याचबरोबर अफगाणिस्तान तालिबानसाठी युवकांची भरती करण्याचे काम या संघटनेमार्फत व्हायचे. आजच्या घडीला हुजीचे दहशतवादी अज्ञात संघटनांबरोबर काम करत अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि भारतात घातपाती कारवाया घडवून आणत आहे. काश्‍मीरचे पाकिस्तानात विलिन व्हावे, यासाठी हुजीचे दहशतवादी गुप्तपणे कार्यरत आहेत.

हेही वाचा: आपणचं पैगंबर असल्याचा महिलेचा दावा; कोर्टानं सुनावला मृत्यूदंड!

हिज्बुल मुजाहिदीन (एमएच): दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिदीनची निर्मिती १९८९ रोजी झाली. २०१७ रोजी या दहशतवादी संघटनेला विदेशी दहशतवादी संघटनांत सामील केले. जम्मू काश्‍मीरमध्ये घातपाती कारवायात हिज्बुल संघटनेचा मोठा सहभाग असतो. तसेच तेथे कारवाया करणारी सर्वात जुनी संघटना म्हणूनही ओळखली जाते. सीआरएसच्या मते, अन्य दहशतवादी संघटनांत अल कायदाचा देखील समावेश आहे. या संघटनेला कराची, आदिवासी भाग, अफगाणिस्तानातून चालवण्यात येते.

दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आश्रयस्थान

अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या दहशतवादावरचा अहवाल ‘कंट्री रिपोर्ट ऑन टेररिझम २०१९’ नुसार काही ठराविक भागात दहशतवादी हल्ले आणि घातपात घडवून आणण्यासाठी पाकिस्तान हे दहशतवाद्यांसाठी आश्रयस्थान बसले आहे. त्याने अफगाणिस्तानबरोबरच भारताला देखील लक्ष्य करणाऱ्या दहशतवाद्यांना थारा दिला आहे. भारताला सतत लक्ष्य करणाऱ्या काही संघटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पाकिस्तान सरकारने जुजबी कारवाई केली आहे.

पाकिस्तानातील अन्य सक्रिय संघटना

पाकिस्तानातील अन्य सक्रिय दहशतवादी संघटनांत अल कैदा इन द सबकॉन्टिनेंट (अकिस), इस्लामिक स्टेट खुरासन प्रांत (आयएसकेपी किंवा आयएस-के), अफगाणिस्तान तालिबान, हक्कानी नेटवर्क, तेहरिक ए तालिबान पाकिस्तान (टीटीपी), बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए), जुंदैल्लाह (अका जयेश अल-अदी), सिपाह ए साहबा पाकिस्तान (एसएसपी) आणि लष्करे झांगवी (एलईजे) या संघटनांचा समावेश आहे. सीएसआरचा अहवाल हा अमेरिकी कॉंग्रेसचा अधिकृत अहवाल नाही. स्वतंत्र तज्ञ हे अमेरिकी खासदारांना माहिती देण्यासाठी वेळोवेळी अहवाल तयार करत असतात.

loading image
go to top