पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील हल्ल्यात तीन सैनिक ठार 

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 31 August 2020

 पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे अधिकारी द्विपक्षीय चर्चा करण्याची तयारी करत असताना अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर आज दहशतवाद्यांनी हल्ला घडवून आणला.

पेशावर- पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे अधिकारी द्विपक्षीय चर्चा करण्याची तयारी करत असताना अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर आज दहशतवाद्यांनी हल्ला घडवून आणला. सीमेवर अल कायदा आणि तालिबानच्या जुन्या ठिकाणांवर शोध मोहिम सुरू असताना दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे तीन सैनिक ठार झाले. खैबर पख्तुनवा प्रांतात दक्षिण वझारिस्तान भागात झालेल्या हल्ल्यात चार सैनिक जखमी झाल्याची माहिती पाकिस्तानच्या सैनिकी प्रवक्त्याने दिली. या हल्ल्याची अद्याप कोणत्याही संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही. 

भारत-चीन सीमेवर पुन्हा एकदा झटापट

वझारिस्तान भाग हा बऱ्याच काळापासून दहशतवाद्यांना बालेकिल्ला राहिला आहे. मात्र या भागातून दहशतवाद्यांचे विशेषत: तालिबानचे उच्चाटन केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तान तालिबान संघटना असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वीही तालिबानने पाकिस्तानी सैनिकांच्या तळांवर हल्ले केले आहेत. राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार अफगाणिस्तानमध्ये ६ हजाराहून अधिक पाकिस्तानी दहशतवादी लपलेले आहेत. या दहशतवाद्यांचा संबंध पाकिस्तान तालिबानशी आहे. या संघटनेकडून पाकिस्तानी सैन्य आणि नागरिकांवर हल्ले केले जातात. 

उभय देशात द्विपक्षीय चर्चा 

दरम्यान, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे अधिकारी विविध मुदद्यावर चर्चा करणार आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, परराष्ट्र सचिव सोहेल मेहमुद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ अफगाणिस्तानशी चर्चा करणार आहे. तसेच अफगाणिस्तानच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व उप परराष्ट्रमंत्री मिरवाईज नाब करणार आहेत. दोन्ही देशांतील सैनिकांत समन्वय, गुप्त माहिती देवाण-घेवाण, अर्थव्यवस्था आणि निर्वासितांच्या मुद्यावर चर्चा केली जाणार आहे. .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan afganistan border attack three solders died