पाकिस्तानकडून 'या' दहशतवादी संघटनेवर बंदी

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

पाकिस्तानने दहशतवादी हाफिज सईद याच्या जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेवर पुन्हा बंदी घातली आहे. तसेच फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशनवरही (एफआयएफ) ही कारवाई करण्यात आली. 

इस्लामाबाद : पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर पाकिस्तानवर जगभरातून दबाव वाढत आहे. या दबावातूनच पाकिस्तानने दहशतवादी हाफिज सईद याच्या जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेवर पुन्हा बंदी घातली आहे. तसेच फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशनवरही (एफआयएफ) ही कारवाई करण्यात आली. 

पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. हाफिज सईद हा 2008 मध्ये झालेल्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. त्याच्या जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेवर मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये पाकिस्तान सरकारने यापूर्वीच बंदी घातली होती. त्यानंतर आता त्याच्या संघटनेसह एफआयएफवर बंदी घालण्यात आली.

याबाबत परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले, की पंतप्रधान खान यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेवर बंदीचा निर्णय घेण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan Bans Hafiz Saeed led Jamat ud Dawa and Its Charity Wing FIF