इम्रान खान म्हणतात, भारताबरोबर युद्ध शक्‍य; व्यक्त केली 'ही' मोठी भीती

वृत्तसंस्था
Sunday, 15 September 2019

भारताबरोबर पारंपरिक युद्ध होण्याची शक्‍यता आहे आणि या युद्धाची व्याप्ती उपखंडाबाहेरही जाऊ शकते, असा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज दिला आहे. तसेच, भारताने जम्मू- काश्‍मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याने त्यांच्याशी आता चर्चा करणार नसल्याचेही इम्रान यांनी सांगितले. 

इस्लामाबाद : भारताबरोबर पारंपरिक युद्ध होण्याची शक्‍यता आहे आणि या युद्धाची व्याप्ती उपखंडाबाहेरही जाऊ शकते, असा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज दिला आहे. तसेच, भारताने जम्मू- काश्‍मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याने त्यांच्याशी आता चर्चा करणार नसल्याचेही इम्रान यांनी सांगितले. 

एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना इम्रान खान यांनी भारताला धमकी देण्याचा प्रयत्न केला. "भारताबरोबर पारंपरिक युद्ध होण्याची दाट शक्‍यता आहे, त्यामुळेच आम्ही संयुक्त राष्ट्रांसह प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून जगाला हस्तक्षेप करण्याचे आवाहन करत आहोत. आम्ही युद्ध सुरू करणार नाही, युद्धामुळे प्रश्‍न सुटतात यावर माझा विश्‍वास नाही. जेव्हा दोन अण्वस्त्रधारी देश पारंपरिक युद्ध लढतात, त्या वेळी याची परिणती अणुयुद्धात होण्याची दाट शक्‍यता असते. या युद्धाची व्याप्ती भारतीय उपखंडाबाहेरही जाऊ शकते,' असे इम्रान खान म्हणाले. देव न करो, पण पाकिस्तानचे भारताबरोबर युद्ध झालेच, त्यात आम्ही पराभूत होऊ लागलो आणि आमच्यासमोर शरण जायचे की स्वातंत्र्यासाठी अखेरच्या श्‍वासापर्यंत लढायचे, असे दोनच मार्ग शिल्लक राहिले तर आम्ही निश्‍चितच दुसरा पर्याय निवडू, असा दावाही इम्रान यांनी केला. भारताविरोधात विजय शक्‍य नसल्याची इम्रान यांना जाणीव असल्याचे यातून सिद्ध होत आहे. 

भारताने कलम 370 रद्द केल्यानंतर भारत- पाकिस्तानमधील तणाव वाढला असून, पाकिस्तानने भारताशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले आहेत. पाकिस्तानला "फायनान्शिअल ऍक्‍शन टास्क फोर्स'च्या काळ्या यादीत घालण्याचा भारताचा प्रयत्न असून त्याद्वारे पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा त्यांचा विचार आहे, असा आरोपही इम्रान यांनी केला आहे. भारताने मात्र जम्मू- काश्‍मीर हा भारताचा अंतर्गत मामला असून पाकिस्तान याबद्दल सातत्याने बेजबाबदार विधाने करत असल्याचा दावा केला आहे. 

पाकव्याप्त काश्‍मीरमधील मोर्चा लांबणीवर 
जम्मू- काश्‍मीरचा दर्जा भारताने काढून घेतल्याचा निषेध म्हणून पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या आवाहनानंतर लांबणीवर टाकण्यात आला आहे. पाकव्याप्त काश्‍मीरची राजधानी समजल्या जाणाऱ्या मुझफ्फराबाद येथून नियंत्रण रेषेवर मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील भाषण होईपर्यंत मोर्चा स्थगित करण्याची विनंती खान यांनी केल्यानंतर तो लांबणीवर टाकण्यात आला. खान यांचे 27 सप्टेंबरला आमसभेत भाषण होणार आहे. 

काश्‍मीरमध्ये शांतता निर्माण होण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी प्रयत्न करावेत आणि तेथील मुलांना शाळेत पुन्हा जाता यावे, यासाठी मदत करावी. येथील मुलांना चाळीस दिवसांपासून शाळेत जाता आलेले नाही. मला काश्‍मिरी मुलींशी थेट बोलायची इच्छा आहे. संपर्क बंद असल्याने काश्‍मिरींचा आवाज जगापर्यंत पोहोचत नाही. - मलाला युसुफझाई, नोबेल पारितोषिक विजेती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan could lose conventional war with India says Imran Khan