पाकिस्तान धोकादायक; ज्यो बायडेन यांचे वक्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Joe Biden

पाकिस्तान धोकादायक; ज्यो बायडेन यांचे वक्तव्य

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी पाकिस्तानला जगातील सर्वांत धोकादायक देश ठरविले आहे. ‘‘पाकिस्तान हा सर्वांत धोकादायक देशांपैकी एक आहे. कोणत्याही सामंजस्याशिवाय या देशात अण्वस्त्रे आहेत,’’ असे ते म्हणाले. यासंबंधीचे निवेदन व्हाइट हाउसने प्रसिद्ध केले आहे.

लॉस एंजिल्समध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाच्या प्रतिनिधींच्या प्रचार समितीच्या नुकत्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी पाकिस्तानबद्दल हे वक्तव्य केले. चीन आणि रशियाबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाबाबत बोलत असताना बायडेन यांनी पाकिस्तानला घातक ठरविले. तसेच त्यांनी चीन आणि रशियालाही फटकारले. ‘‘ हा असा माणूस (शी जिनपिंग) आहे त्याला स्वतःला काय हवे हे चांगले समजते, पण त्याच्यापुढे प्रचंड समस्या आहेत.

आम्ही त्या कशा हाताळू शकतो? रशियामध्ये जे चालले आहे ते पाहता आम्ही त्या समस्या कशा सोडवू शकतो? आणि मला वाटते की जगातील सर्वांत धोकादायक देशांपैकी एक पाकिस्तान असू शकतो,’’ असे बायडेन म्हणाले.

जागतिक पातळीवर बदलणारी भू-राजकीय परिस्थितीसंबंधी ते म्हणाले, की जग झपाट्याने बदलत होते आणि देश त्यांच्या सहकाऱ्यांवर फेरविचार करत होते. सत्य स्थिती ही आहे, की जग आपल्याकडे पाहत आहे आणि यावर माझा विश्वास आहे. हा काही विनोद नाही. बदलणाऱ्या जगात आमची भूमिका काय आहे, याकडे आमच्या शत्रूंचेही लक्ष असते. जगाला पूर्वी कधीही नव्हत्या अशा ठिकाणी नेण्याची क्षमता अमेरिकेकडे आहे यावर त्यांनी जोर दिला.

रशिया आणि चीनचा उल्लेख भाषणात करीत बायडेन म्हणाले, ‘‘आज संपूर्ण जग बदलले आहे. क्युबातील क्षेपणास्त्र संकटानंतर सामरिक अण्वस्त्रांचा जे केवळ तीन, चार हजार लोकांचा जीव घेईल, याचा वापर करण्याची धमकी देणारा रशियाचा एक नेता होईल, असे तुमच्यापैकी कोणाला कधी वाटले का, असे सवाल बायडेन यांनी केला. रशिया, भारत आणि पाकिस्तानसंबंधी चीनचे त्यांच्या धोरणाकडे लक्ष असेल, अशी स्थिती निर्माण होईल, असा विचार कोणी केला होता.’’

‘बायडेन यांनी माफी मागावी’

अमेरिकेबरोबरील संबंधात सुधारणा करण्याचा प्रयत्न पाकिस्तानचे अध्यक्ष शहबाझ शरीफ यांचे सरकार करीत आहे. पण ज्यो बायडेन यांनी पाकिस्तानबद्दल केलेल्या वक्तव्याने त्याला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः पाकिस्तानचे माजी अध्यक्ष इम्रान खान यांचे समर्थक नाराज झाले आहे. अशा विधानांबद्दल बायडेन यांनी पाकिस्तानची माफी मागावी, अशी मागणी इम्रान खान यांचे निकटवर्तीय आणि माजी मंत्री शिरीन मजारी यांनी केली आहे.

पाकिस्तानमध्‍ये अण्वस्त्र

पाकिस्तानमध्ये सध्या १६५ अण्वस्त्र आहेत. पण त्यात सातत्याने भर पडत आहे. ‘बुलेटिन ऑफ ॲटोमिक सायंटिस्ट’च्या नव्या अहवालात म्हटले आहे की पाकिस्तानचे अणुबाँब बनविण्याचा वेग कायम राहिला तर २०२५ पर्यंत त्यांच्याकडे २०० अणुबाँब असतील.

जिनपिंग यांच्याशी सर्वाधिक संपर्क

इतर देशांशी तुलना करता शी जिनपिंग यांच्या संपर्कात मी सर्वाधिक काळ होतो. मी त्यांच्याबरोबर ७८ तासांपेक्षा जास्त काळ होतो. त्यातील ६८ तास गेल्या दहा वर्षांतील असून ते वैयक्तिक पातळीवरील होते. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी ती जबाबदारी माझ्यावर सोपविली होती. जिनपिंग यांच्यासह हजारो किलोमीटर प्रवास केला आहे. स्वतःला काय हवे याची जाण त्यांना आहे.