esakal | इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या; सरकार पाडण्यासाठी विरोधक एकत्र
sakal

बोलून बातमी शोधा

Imran_Khan_25.jpg

इम्रान यांचे सरकार पाडण्यासाठी देशपातळीवर मोठे आंदोलन सुरु करण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र आले आहेत.

इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या; सरकार पाडण्यासाठी विरोधक एकत्र

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये परंपरागत पाडापाडीच्या राजकारणाला वेग आला असून देशातील प्रमुख विरोधी पक्षांची बैठक होऊन त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. इम्रान यांचे सरकार पाडण्यासाठी देशपातळीवर मोठे आंदोलन सुरु करण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र आले आहेत.

पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या नेतृत्वाखाली काल (रविवारी) झालेल्या या बैठकीला पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज गट), जमैत उलेमा ए इस्लाम फझल आणि इतर अनेक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत २६ मुद्यांचा ठराव मंजूर करण्यात आला. यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सरकारविरोधात आंदोलन सुरु करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या सर्व विरोधी पक्षांनी मिळून ‘पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट’ या नावाने आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्यामार्फत ऑक्टोबरपासून इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ पक्षाचे सरकार पाडण्यासाठी देशभर आंदोलन सुरु केले जाणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. ज्या लोकांनी इम्रान यांना सत्तेत आणले, त्यांनीच या सरकारला टेकू देत बनावट स्थैर्य दिले आहे, असा आरोप विरोधकांनी केला. यावेळी त्यांचा रोख पाकिस्तानच्या लष्कराकडे होता.

अमेरिकेशी मैत्री कराल तर जीवे मारु; चीनने तैवानच्या राष्ट्रपतींना दिली उघड धमकी

भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरलेले आणि पाकिस्तान सरकारने फरार म्हणून घोषित केलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी लंडनमधून या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभाग घेतला होता.

विरोधकांचा निर्णय

विरोधी पक्षांच्या ठरावानुसार, आंदोलन टप्प्याटप्प्यात सुरु होणार आहे. पहिल्या टप्प्यात विरोधी पक्ष चारही प्रांतांमध्ये संयुक्त सभा घेणार आहेत. दुसरा टप्पा डिसेंबरमध्ये सुरु होणार असून या महिन्यात विरोधी पक्ष देशभर सभा आणि मोर्चे घेणार आहेत. अखेरच्या टप्प्यात, जानेवारी महिन्यात इस्लामाबादच्या दिशेने निर्णायक ‘लाँग मार्च’ सुरु केला जाईल, असे विरोधकांनी जाहीर केले आहे. याशिवाय, संसदेत सरकारला असहकार्य करणे, आंदोलनात बुद्धीजीवी आणि कामगार वर्गाला सहभागी करून घेणे, सरकारविरोधात कायदेशीर मार्गांचा अवलंब करणे, असे निर्णयही बैठकीत घेण्यात आले.