esakal | बॉलिवूड फिल्मची क्लिप शेअर केल्याने ट्रोल झाले इम्रान खान; शेवटी डिलीट केली पोस्ट

बोलून बातमी शोधा

बॉलिवूड फिल्मची क्लिप शेअर केल्याने ट्रोल झाले इम्रान खान; शेवटी डिलीट केली पोस्ट
बॉलिवूड फिल्मची क्लिप शेअर केल्याने ट्रोल झाले इम्रान खान; शेवटी डिलीट केली पोस्ट
sakal_logo
By
टीम ई सकाळ

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असतात. वेगवेगळ्या मुद्यांवर ट्विट करुन ते आपलं मत मांडत असतात. मात्र, अनेकवेळा त्यांना आपली मते मांडल्याने लोकांच्या टीकेचा भडीमार सहन करावा लागतो. अनेकवेळा ते यामुळेच वाईटरित्या ट्रोल देखील झाले आहेत. आता देखील ते बॉलिवूड फिल्ममधील एक क्लिप शेअर केल्याने लोकांच्या निशाण्यावर आले आहेत. एका बॉलिवूड फिल्मचा हवाला दिल्याकारणाने त्यांना ट्रोल केलं जातंय. त्यानंतर त्यांना आपली ही पोस्ट डिलीट करावी लागली आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केली बॉलिवूडची क्लिप

ही क्लिप शेअर करताना त्यांनी कॅप्शन दिलंय की, पीटीआयचं सरकार सत्तेवर आल्याच्या पहिल्या दिवसापासूनच भ्रष्ट माफियांकडून हेच सगळं केलं गेलंय. या क्लिपच्या माध्यमातून इम्रान खान यांनी आपल्या सरकारच्या विरोधात कथित कटकारस्थानाची तुलना या फिल्मशी केली आहे. इम्रान खान यांनी 1984 सालची बॉलिवूड फिल्म इन्कलाबची एक क्लिप इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

या क्लिपमध्ये अभिनेता कादर खान दिसून येत आहेत. त्यात कादर खान आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना म्हणताना दिसत आहेत की, गीता आणि रामायणमध्ये कुठेही हे लिहलं नाहीये की वर्षानुवर्षे सत्तेत राहणाऱ्या सरकारने पुढे देखील सत्तेत राहिलं पाहिजे. आम्ही देखील सरकार बनवण्याचा अधिकार बाळगतो. आम्ही असंच करु मग काहीही होवो. पुढे ते म्हणताना दिसतात की, लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी आपल्याला सरकारवरुन लोकांचा विश्वास कमी करायला हवा.

लोकांना यावर विश्वास बसायला हवा की सध्याचं सरकार बिनकामी सरकार आहे आणि ते काहीही करु शकत नाही. यासाठी प्रत्येक प्रांताच्या प्रत्येक गल्लीबोळात भय आणि अपराधाचं वातावरण असायला हवं. पंतप्रधान इम्रान खान यांच्या या पोस्टवर अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्यांच्यावर टीकेचा भडीमार केलाय तर काहींनी त्यांच्या या पोस्टवरुन त्यांची थट्टा देखील उडवली आहे. इम्रान खान सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकार नायला इनायत यांनी इम्रान सरकारवर टीका करत म्हटलंय की, इम्रान खान यांच्या बचावासाठी बॉलिवूड पुढे आलंय. तर काही युझर्सनी असं म्हटंलय की, इम्रान खान यांना आपल्या सरकारच्या बचावासाठी आणि विरोधकांवर हल्ला करण्यासाठी आता बॉलिवूडच्या फिल्म्सचा आसरा घ्यावा लागतोय.