Video : पाक नेत्याला धू-धू धुतले अन् अंडी फेकली

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांना लंडनमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण करुन त्यांच्यावर अंडी फेकली आहेत.

लंडनः पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांना लंडनमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण करुन त्यांच्यावर अंडी फेकली आहेत. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 भारत सरकारने रद्द केल्यानंतर भारताला अण्वस्त्र हल्ल्याची शेख रशीद यांनी दिली होती.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अवामी मुस्लिम लीगचे प्रमुख आणि पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांच्यावर एका पुरस्कार सोहळ्यासाठी एका बड्या हॉटेलमध्ये गेले होते. दरम्यानच्या काळात ते सिगरेट फुंकण्यासाठी बाहेर आले असता काही अज्ञात लोकांनी त्यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला केला. बेदम मारहाण करतानाच त्यांच्यावर अंडीही फेकली. हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला.

दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान पीपल्स पार्टीशी (पीपीपी) संबंधीत नेत्यांनी घेतली आहे. पीपीपीशी संलग्न असलेल्या पीपल्स यूथ ऑर्गनायझेशन युरोप या गटाचा अध्यक्ष असणाऱ्या आसिफ अली खान आणि पक्षाच्या महिला शाखेच्या समा नमाज यांनी शेख यांच्यावर आम्हीच हल्ला केला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

शेख यांनी काही दिवसांपूर्वी पीपीपीचे प्रमुख बिलावल भुट्टो जरदारी यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. शेख यांच्या या वक्तव्यावर पीपीपीचे कार्यकर्ते आणि महिला नाराज होत्या. त्यांनी आपला राग शेख यांना मारहाण करुन व्यक्त केला. मात्र, आम्ही शेख यांच्यावर केवळ अंडी फेकल्याचे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानमधील महिला पत्रकार नायला इनायत यांनी या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ ट्विटवरुन पोस्ट केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan railways minister sheikh rashid attacked and pelt him with eggs in london