पाकचा दहशतवाद्यांना आश्रय

पीटीआय
Wednesday, 13 November 2019

अमेरिकेच्या सैनिकांना ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून आश्रय दिला जात असल्याचा दावा संयुक्त राष्ट्रांतील (यूएन) अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी त्यांच्या नव्या पुस्तकात केला आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या सैनिकांना ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून आश्रय दिला जात असल्याचा दावा संयुक्त राष्ट्रांतील (यूएन) अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी त्यांच्या नव्या पुस्तकात केला आहे.

भारतीय-अमेरिकी वंशाच्या हॅले यांनी लिहिलेल्या ‘विथ ऑल ड्यू रिस्पेक्‍ट - डिफेंडिंग अमेरिका विथ ग्रीट अँड ग्रेस’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. या पुस्तकात हॅले यांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केले आहेत. हॅले यांनी म्हटले आहे की, अमेरिकेकडून सर्वाधिक मदत दिल्या जाणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तान आघाडीवर आहे. असे असूनही पाकिस्तानने यूएनमध्ये अमेरिकेच्या विरोधात मतदान केले आहे. एवढेच नव्हे, तर अमेरिकी सैनिकांना ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांनाही पाकिस्तानकडून आश्रय दिला जातो. या बाबतचे मी सादर केलेले निष्कर्ष ऐकून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचंड संताप व्यक्त केला होता.

‘२०१७ मध्ये अमेरिकेने पाकिस्तानी लष्कराला सुमारे एक अब्ज डॉलरची मदत दिलेली आहे. असे असतानाही पाकिस्तानने यूएनमध्ये तब्बल ७६ वेळा अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्याहून अधिक धक्कादायक बाब म्हणजे अमेरिकेच्या सैनिकांना ठार करणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून उघडपणे आश्रय दिला जातो, असे हॅले यांनी पुस्तकात म्हटले आहे. आपण सादर केलेल्या माहितीनंतरच ट्रम्प यांनी अमेरिकी काँग्रेसला सूचना करत असे प्रकार होणार नाहीत, यासाठी कायदा करण्याचे आदेश दिले होते, असे हॅले यांचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan shelter for terrorists