पाकिस्तानच्या मंत्रिमंडळात शिरला कोरोना; काल परराष्ट्रमंत्री तर आज खुद्द...

वृत्तसंस्था
Monday, 6 July 2020

एका दिवसापूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महेमुद कुरेशी यांनी आपल्याला कोरोना झाल्याचं जाहीर केलं होतं. आता पाकिस्तानचे आरोग्यमंत्री जाफर मिर्झा यांचाही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

इस्लामाबाद- एका दिवसापूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महेमुद कुरेशी यांनी आपल्याला कोरोना झाल्याचं जाहीर केलं होतं. आता पाकिस्तानचे आरोग्यमंत्री जाफर मिर्झा यांचाही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली. कोरोना विषाणूने पाकिस्तानमधील अनेक बड्या नेत्यांना हेरले आहे. त्यामुळे कोरोना विषाणू पाकिस्तानला चांगलाच पिडत असल्याचं दिसत आहे. 

चीनसोबत चर्चेसाठी भारताचा 'एकटा टायगर'; सैन्य मागे घेण्यास पाडलं भाग
आरोग्यमंत्री जाफर मिर्झा यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. माझी कोविड-19 चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी स्व:ताला विलगीकरणात ठेवले आहे आणि आवश्यक ती काळजी घेत आहे. माझ्यात सध्या सौम्य लक्षणे दिसत आहेत. माझ्यासाठी तुमच्या दयाळू प्रार्थना सुरुच ठेवा. माझ्या सहकार्यांनो, तुम्ही तुमचं काम सुरुच ठेवा. तुम्ही खूप मोठं काम करत आहात आणि मला तुमचा अभिमान आहे, असं ते म्हणाले आहेत.

कोरोनाविषाणूने पाकिस्तान पुरता बेजार झाला आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत तर आहेच, पण अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्यांच्यावर महत्वाची जबाबदारी आहे, अशा आरोग्यमंत्र्यांनाच कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आमचं काय होणार अशी चिंता सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांना सतावत आहे. 

पाकिस्तानमधील अनेक आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच अनेक आमदारांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्री शेख रशिद यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील तीन केंद्रीय मंत्री कोरोनाग्रस्त झाले आहेत. या नेत्यांच्या संपर्कात आलेल्यांचा माग काढला जात असून त्यांची कोविड चाचणी घेतली जात आहे.

...म्हणून आम्ही गलवान खोऱ्यातून माघार घेतोय; चीनने दिली कबुली
दरम्यान, पाकिस्तानमध्ये एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2,33,526 पर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत 1.3 लाख लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे, तर आतापर्यंत 4,800 जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण सिंध आणि पंजाब प्रांतात सापडले आहेत.  या दोन प्रातांत अनुक्रमे 96,000 आणि 82,000 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये तब्बल 14 हजार कोरोनाबाधित आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistani health minister test corona positive