चीनच्या घुसखोरीनंतर नेपाळमध्ये उद्रेक ; जनता उतरली रस्त्यावर   

टीम ई-सकाळ
Wednesday, 23 September 2020

चीनच्या पावलावर पाऊल ठेवत शेजारच्या नेपाळने देखील भारतविरोधी अजेंडा आपल्या देशात राबवला होता. मात्र चीनने नेपाळला देखील मोठा धक्का दिला आहे.

भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद यावर्षीच्या एप्रिल महिन्यापासून चांगलाच उफाळला आहे. तसेच भारत आणि चीन यांच्यातील सैन्यात जून महिन्याच्या मध्यात जोरदार संघर्ष देखील झाला होता. आणि या संघर्षात भारतीय सैन्यातील 20 जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर चीनच्या सैन्याची देखील हानी झाली होती. त्यानंतर चीनच्या पावलावर पाऊल ठेवत शेजारच्या नेपाळने देखील भारतविरोधी अजेंडा आपल्या देशात राबवला होता. मात्र चीनने नेपाळला देखील मोठा धक्का दिला आहे.

चीनच्या ड्रॅगनने नेपाळच्या काही भागात घुसखोरी केल्याचे काही दिवसांपूर्वीच उघड झाले होते. व आता नेपाळच्या हुमला भागात चीनने बळकावलेल्या या भागात अवैध्यरित्या बांधकाम सुरु केल्याची पुष्टी मिळाली आहे. त्यानंतर नेपाळच्या जनतेने चीनच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला आहे. नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडू शहरात लोकांनी रस्त्यावर उतरत चीनच्या विरोधात घोषणा दिल्या आहेत. इतकेच नाही तर नेपाळच्या जनतेने काठमांडू स्थित चिनी दूतावासापर्यंत मोर्चा काढत जोरदार नारेबाजी केल्याची माहिती मिळाली आहे. याव्यतिरिक्त नेपाळच्या लोकांनी यावेळेस चिनी साम्राज्यवादाविरोधात नाराजी व्यक्त करत, नेपाळची जमीन परत करण्याची मागणी केली. 

कोरोनाच्या प्रसाराचे कारण अमेरिकेने घेतलं मागे; सीडीसीवर दुसऱ्यांदा ओढावली वेळ

तसेच नेपाळमधील सोशल माध्यमांवर देखील चीनच्या विरोधात वातावरण तापू लागले आहे. सोशल माध्यमांवर चीनच्या विरोधातील प्रदर्शनाचे व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात येत आहेत. त्यामुळे नेपाळची जनता चिनी अतिक्रमणाविरोधात आपला संताप व्यक्त करत आहेत. तर नेपाळमधील बालूवाटर स्थित चिनी दूतावासाच्या बाहेर मोठ्या संख्येने सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.  

नुकतेच चीनने हुमला जिल्ह्यातील नेपाळी भूमीवर अतिक्रमण केल्याचे समजल्यावर, नेपाळ सरकारने एका अधिकाऱ्याच्या टीमला वास्तविक जागेचा अभ्यास करण्यासाठी पाठवले होते. अभ्यास केल्यानंतर या पथकाने केंद्राकडे अहवाल पाठविला आहे. परंतु नेपाळ सरकारने अद्याप सीमेबाबत कोणतीही प्रक्रिया दिलेली नाही. चीनने या भागात सीमेवरील तटबंदी काढून नवीन काही इमारती बांधल्याची माहिती मिळाली होती. तर नेपाळ मधील चीनच्या दूतावासाने या इमारती व बांधकाम चीनच्या हद्दीतच बांधल्याचे म्हटले आहे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People took to the streets in Nepal after the Chinese incursion