esakal | #HowdyModi : 'अब की बार ट्रम्प सरकार'; मोदींनी फोडला ट्रम्प यांच्या प्रचाराचा नारळ!
sakal

बोलून बातमी शोधा

Howdy-Modi

काही दिवसांपूर्वीच झालेल्या 'जी-7' देशांच्या परिषदेत 'तुमचे इंग्रजी चांगले आहे,' असा ट्रम्प यांच्याकडून शेरा मिळालेल्या मोदींनी इंग्रजीतूनच भाषण केले.

#HowdyModi : 'अब की बार ट्रम्प सरकार'; मोदींनी फोडला ट्रम्प यांच्या प्रचाराचा नारळ!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

ह्युस्टन : भारत आणि अमेरिकेतील मैत्री नव्या उंचीवर पोहोचली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रुपाने भारताला 'व्हाइट हाऊस'मध्ये विश्‍वासू मित्र मिळाला आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकी-भारतीयांशी संबोधित केले. या कार्यक्रमाला खुद्द ट्रम्प उपस्थित राहिल्याने इतिहास घडला असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण करत मोदींचे आणि भारताचे कौतुक केले. 

पंतप्रधान मोदींच्या या अमेरिका दौऱ्यात ज्या कार्यक्रमाची सर्वाधिक चर्चा झाली, त्या 'हाउडी, मोदी' या कार्यक्रमाला मोदींनी रविवारी (ता.22) अमेरिकी-भारतीयांना संबोधित केले. डोनाल्ड ट्रम्प यांना येण्यास विलंब झाल्याने मोदींचे भाषण सुरू होण्यास उशीर झाला. मात्र, तरीही उपस्थितांचा उत्साह जराही कमी झाला नव्हता.

ट्रम्प यांचे आगमन झाल्यावर मोदींसह ते स्टेडियममध्ये प्रवेश करताच पुन्हा एकदा मोदी-मोदीचा गजर आणि ढोल-ताशांच्या निनादाने स्टेडियम दुमदुमले. दोन्ही देशांच्या राष्ट्रगीतांचे गायन झाल्यावर मुख्य कार्यक्रमाला सुरवात झाली. काही दिवसांपूर्वीच झालेल्या 'जी-7' देशांच्या परिषदेत 'तुमचे इंग्रजी चांगले आहे,' असा ट्रम्प यांच्याकडून शेरा मिळालेल्या मोदींनी इंग्रजीतूनच भाषण केले.

अमेरिकावासीयांना 'गुड मॉर्निंग' करत त्यांनी सर्वप्रथम अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याच कौतुकाला सुरवात केली. ट्रम्प यांच्याबरोबरील प्रत्येक भेटीत मैत्रीची उब जाणवल्याचे मोदी यांनी सांगितले. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा शक्तीशाली झाल्याचे सांगितले. भारतात अनेक राज्यांत निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणाऱ्या मोदींनी अमेरिकेत पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणूकीचाही बिगुल फुंकला. त्यांनी 'अब की बार ट्रम्प सरकार'ची घोषणा देत ट्रम्प यांचा जणू प्रचारच केला.

''दोन्ही देशांची मैत्री नव्या उंचीवर गेली आहे. व्हाइट हाऊसमध्ये भारताला ट्रम्प यांच्यासारखा सर्वांत विश्‍वासू मित्र मिळाला आहे. ह्युस्टन ते हैदराबाद, बोस्टन ते बंगळूर, शिकागो टू शिमला, लॉस एंजेलिस ते लुधियाना आणि न्यूजर्सी ते न्यू दिल्ली कोट्यवधी लोक हा कार्यक्रम पाहण्यासाठी टीव्हीला चिकटून बसले आहेत. ते सर्व आपल्याबरोबर आहेत. ते या घडत असलेल्या इतिहासाचे साक्षीदार आहेत,'' असे मोदी म्हणाले.

''तुम्ही तुमच्या कुटुंबीयांशी माझी ओळख करून दिली होती, आता माझ्या कुटुंबीयांशी तुमची ओळख करून देतो,'' असे म्हणत त्यांनी समोरील हजारो भारतीयांच्या समुदायाकडे हात केला, तेव्हा पुन्हा एकदा मोदी नावाचा गजर झाला.

loading image