हॉटेलचा दरवाजा तोडून नवाझ शरीफ यांच्या जावयाला अटक, इम्रान खान यांचा केला होता विरोध

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 October 2020

पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात आयोजित केलेल्या मोर्चात सहभाग नोंदवला होता.

कराची- पाकिस्तानमधील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापल्याचे दिसत आहे. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे जावई आणि पाकिस्तान मुस्लिम लीगच्या (एन) नेत्या मरियम शरीफ यांचे पती सफदर अवान यांना हॉटेलचा दरवाजा तोडून अटक केली आहे. त्यांनी पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात आयोजित केलेल्या मोर्चात सहभाग नोंदवला होता. सफदर यांना कराची येथून अटक करण्यात आली आहे. 

पाकिस्तानमध्ये शुक्रवारी सरकारविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एक मोठा मोर्चा काढला होता. या मोर्चात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. याचदरम्यान विविध विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली होती.

हेही वाचा- राहुल गांधी नव्हे तर राहुल लाहोरी !

पोलिसांनी कॅप्टन सफदर अवान यांना अक्षरशः हॉटेलचा दरवाजा तोडून बाहेर काढले आणि त्यांना अटक केली. मरियम शरीफ यांनी टि्वट करुन याची माहिती सर्वांना दिली. त्यांनी अटकेचा निषेध केला आहे. 

मरियम नवाझ यांनी शुक्रवारी झालेल्या मोर्चाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. लाहोरमधून बाहेर पडण्यास मोर्चाला सहा तास लागल्याचा व्हिडिओ शेअर करत जनतेचा अभूतपूर्व उत्साह असल्याचेही त्या म्हणाल्या. 

दरम्यान, पीडीएम आघाडीत पीएमएल-एन, पीपीपी, जेयूआय-एफ समवेत 11 विरोधी पक्ष सहभागी झाले आहेत. हे सरकार विरोधी आंदोलन लष्कराच्या अत्याचाराच्या विरोधात, भ्रष्टाचार, आर्थिक मंदी आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी करण्यात आले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police arrests Safdar Awan husband of PML leader Maryam Nawaz Sharif