अमेरिकेत पोलिओचा रुग्ण आढळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Polio

अमेरिकेत पोलिओचा रुग्ण आढळला

न्यूयॉर्क - न्यूयॉर्कच्या रॉकलँड काउंटीतील एका वीस वर्षीय तरुणाला पोलिओ झाल्याचे आरोग्य विभागाने गुरूवारी जाहीर केले. सुमारे दहा वर्षांतील हे पहिलेच प्रकरण आहे. त्याने पोलिओची लस घेतलेली नव्हती आणि तो जून महिन्यांत उपचारासाठी दवाखान्यात दाखल झाला होता. अमेरिकेने दहा वर्षांपूर्वी पोलिओमुक्त झाल्याची घोषणा केली होती. परंतु कालच्या घटनेने या घोषणेला धक्का बसला आहे.

या तरुणाला जून महिन्यांत अर्धांगवायूचा झटका आला. त्याच्यात पोलिओची लक्षणे वाढली होती. विविध चाचण्या केल्यानंतर त्याला पोलिओ असल्याचे आरोग्य अधिकाऱ्याने जाहीर केले. अलीकडच्या काळात त्याने देशाबाहेर प्रवास केला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्याच्यापासून संसर्गाचा धोका नाही. परंतु त्याला कोठे लागण झाली आणि अन्य लोकांना विषाणूंची लागण झाली आहे, याचा शोध घेतला जात आहे. वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, युवकाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तो पत्नी आणि मुलांसमवेत राहत आहे. तो उभा राहू शकतो, परंतु चालताना अडचणी येत असल्याचे म्हटले आहे.

बहुतांश अमेरिकी नागरिकांचे पोलिओ लसीकरण झालेले आहे, परंतु ज्यांनी लस घेतलेली नाही, त्यांना धोका राहू शकतो, असे रॉकलँड काऊंटीच्या आरोग्य आयुक्त डॉ. पॅट्रिशिया शृब्रेल रुपर्ट यांनी सांगितले. पोलिओचा रुग्ण आढळल्याने रॉकलँड काउंटीत दोन दिवस लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. तेथील लोकांच्या आरोग्यासाठी न्यूयॉर्क स्टेट आरोग्य विभाग व साथरोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र एकत्रितरीत्या काम करत आहे, असे त्या म्हणाल्या. अमेरिकेत अजूनही लसीकरण मोहीम राबविली जाते.

फेडरल अधिकाऱ्यांकडून चार डोसची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार दोन महिन्यांच्या आत, चार महिन्यांच्या आत, त्यानंतर ६ ते १८ महिन्यांत आणि नंतर ४ ते ६ वर्षादरम्यान पोलिओ डोस दिला जातो. काही राज्यांत तीन डोस दिले जातात. ‘सीडीसी’ ने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत दोन वर्षाच्या सुमारे ९३ टक्के मुलांना पोलिओचे किमान तीन डोस दिलेले आहेत.

टॅग्स :americaPatientpolio