Polio virus : अमेरिका, ब्रिटन, मोझांबिकमध्ये पोलिओचा विषाणू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Polio virus America Britain Mozambique Vaccination campaign hit due to Corona

Polio virus : अमेरिका, ब्रिटन, मोझांबिकमध्ये पोलिओचा विषाणू

सिएटल : जगभरात कोरोना संकटामुळे काही काळ लसीकरण मोहीम ठप्प पडल्याने अमेरिका, ब्रिटन आणि मोझांबिक देशात पोलिओचे विषाणू आढळून आले आहेत. लंडनच्या एका भागातील सांडपाण्यात व काही महिन्यांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये पोलिओचा विषाणू आढळून आला. मोझांबिकमध्ये मे महिन्यांत पोलिओचा वेगळा विषाणू आढळला तर फेब्रुवारीत मलावीत पोलिओचा विषाणू आढळून आला.

बिल ॲड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या पोलिओ शोध पथकातील तंत्रज्ञान, संशोधन आणि विश्‍लेषकचे उपसंचालक डॉ. आनंद शंकर बंदोपाध्याय म्हणाले, की जगातील कोणत्याही भागात पोलिओचे विषाणू सापडणे हे सर्वांसाठी धोकादायक ठरू शकते. कोरोना काळ आणि लॉकडाउनमुळे पोलिओ लसीकरण मोहीम मंदावली. कोरोनापूर्व काळाप्रमाणेच लसीकरण मोहीम सुरू राहिली असती तर पोलिओचे विषाणू सापडले नसते. २०२० मध्ये कोरोना संसर्गाचा फैलाव झाला. सोशल डिस्टिन्सिंगच्या नियमांमुळे चार महिन्यांसाठी पोलिओ लसीकरण मोहीम थांबविण्यात आली. परिणामी पोलिओ विषाणूंचा प्रसार झाला.

कोरोना संसर्गामुळे जगभरातील पोलिओ लसीकरण मोहीमेवर नकारात्मक परिणाम झाला आहे. तसेच चुकीची माहिती, हलगर्जीपणा, दुर्गम भागापर्यंत पोलिओ लस पोचवणे यासारख्या अडचणींचा देखील सामना करावा लागत असून त्यामुळे पोलिओ विषाणूंचा प्रसार झाला, असेही बंदोपाध्याय म्हणाले. जुलै महिन्यांत न्यूयॉर्क येथील रॉकलँड कौंटीत राहणाऱ्या व्यक्तीत पोलिओचा विषाणू आढळून आला. त्याने लस न घेतलेली नव्हती. याशिवाय त्याच्या घराजवळ सांडपाण्यातही विषाणू आढळला. तसेच उत्तर आणि पूर्व लंडनमध्ये फेब्रुवारी आणि मे महिन्यात सांडपाण्यात विषाणू सापडला. मे महिन्यांत मोझांबिक येथे एका बाळात पोलिओचा विषाणू आढळून आला. तत्पूर्वी मध्य फेब्रुवारीत मलावी येथे पोलिओच्या वेगळ्या प्रकारचा विषाणू आढळला होता. त्यानंतर या विषाणूमुळे पोलिओ होण्याचे दुसरे उदाहरण आहे.

१९९० च्या दशकांत शेवटचा रुग्ण

जागतिक आरोग्य संघटनेची संस्था जागतिक पोलिओ निर्मुलन पुढाकार (जीपीईआय) च्या संकेतस्थळानुसार शेवटचा पोलिओचा वेगळ्या प्रकारचा विषाणू हा अमेरिका आणि ब्रिटनमध्ये अनुक्रमे १९७९ आणि १९८२ मध्ये आढळून आला होता.

पोलिओ निर्मूलनात भारताचे यश

बंदोपाध्याय यांनी भारतातील पोलिओ निर्मुलन मोहिमेला मिळालेल्या यशाचे कौतुक केले. जागतिक आरोग्याच्या दृष्टीने भारताचे यश मोलाचे आहे, असे ते म्हणाले. अनेकांना वाटते की, पोलिओला रोखणारा भारत हा शेवटचा देश असेल. कारण या ठिकाणी भौगोलिक आव्हाने खूप आहेत. पोलिओ लसीकरण मोहिमेचा वेग कायम ठेवणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जागतिक आरेाग्य संघटनेने २०१४ रोजी भारतासह आग्नेय आशियातील दहा अन्य देशांना पोलिओमुक्त देश म्हणून घोषित केला आहे.