कौन बनेगा प्रेसिडेंट...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 November 2020

डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार अल्बर्ट उर्फ ॲल गोर आणि रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार जॉर्ज डब्लु बुश ह्यांच्या चुरसीत गोरना बुश पेक्षा ५,४३,८९५ जास्त लोकमते मिळाली होती.

साल २००० मधील डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार अल्बर्ट उर्फ ॲल गोर आणि रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार जॉर्ज डब्लु बुश ह्यांच्या चुरसीत गोरना बुश पेक्षा ५,४३,८९५ जास्त लोकमते मिळाली होती. २०१६ मधील चुरसीत हिलरी क्लिंटनला ट्रम्पपेक्षा २,८६८,६८६ जास्त लोकमते मिळाली. लोकमतें जास्त मिळुन देखील २००० मध्ये ॲल गोर व २०१६ मध्ये हिलरी क्लिंटनला अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत पराभव पत्करावा लागला... कारण त्या दोघांना २७० पेक्षा कमी "इलेक्टोरल कॉलेज" मते वाट्याला आली. 

जॉर्ज बुश ह्यांना २७१ तर ॲल गोर ना २६६, आणि डॉनल्ड ट्रम्प ना ३०४ तर हिलरी क्लिंटनला २२७ इलेक्टोरल कॉलेज मते प्राप्त झाली होती. अमेरिकन लोकशाहीत अध्यक्षपद जिंकण्या करिता २७० इलेक्टोरल कॉलेज मते प्राप्त करणे आवश्यक आहे. अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत इलेक्टोरल कॉलेज मते, लोकमतांवर मात करते. 
 
लोकशाहीमध्ये लोकमतास प्राधान्य असते व ज्या उमेदवारास सर्वाधिक लोकमत, म्हणजेच बहुमत मिळेल, तो उमेदवार निवडणुक जिंकतो. खरे पाहता लोकशाहीचे हेच मुलभुत तत्व आहे. आश्चर्य वाटेल, पण अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या बाबतीत ते विधान खरे नाही! 

अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत अध्यक्षीय उमेदवारास नागरिकांनी केलेल्या मतदानात बहुमत मिळवून देखील तो उमेदवार अध्यक्षपद हरू शकतो. होय, शंभर टक्के खरे आहे... अमेरिकन लोकशाहीत केवळ लोकमताचे बहुमत मिळाले म्हणुन त्या उमेदवारास अध्यक्षपद बहाल करण्यात येत नाही. त्याचे कारण अध्यक्षपद जिंकण्या करिता "इलेक्टोरल कॉलेज"चे बहुमत मिळणे जरुरी आहे, लोकमताचे नाही. 

इलेक्टोरल कॉलेज…
इलेक्टरोरल कॉलेज म्हणजे काय? कोठे वसले आहे हे कॉलेज? इलेक्टोरल कॉलेज ही वास्तु नाही, किंवा संस्था नाही. पण अमेरिकन अध्यक्ष पदाच्या निवडनुकीच्या प्रक्रियेचे (Process) नाव आहे, त्या प्रक्रिये द्वारे अमेरिकेचा अध्यक्ष निवडला जातो. लोकमता द्वारे नाही. 
 
६ जुलै १७७६ मध्ये अमेरिकेची प्रस्थापना झाली. जॉर्ज वॉशिंग्टन व त्यांचे ९ सहकारी ज्यांना अमेरिकेचे "संस्थापक" म्हणजेच "फॉऊंडिंग फादर्स" संबोधतात त्यांनी विचारविनिमय करून अमेरिकन लोकशाही कशी असावी, निवडणुकीच्या कोणत्या प्रक्रिया असाव्यात त्या विषयी अमेरिकन घटनेत तरतुदी केल्या. त्या पैकी “इलेक्टोरल कॉलेज”  हि एक तरतुद आहे. अमेरिकेच्या "संथापकांना" केवळ लोकमातांनीच अध्यक्ष निवडुन यावा हे मान्य नव्हते  त्याच प्रमाणे सेनेटर्स व काँग्रेसमन्स ने अध्यक्षाची निवड करावी हे पण मान्य नव्हते. अध्यक्ष निवडायच्या प्रक्रियेत प्रत्येक राज्याचे योगदान असावे म्हणुन त्यांनी "इलेक्टोरल कॉलेज" ची घटनेत तरतुद केली. इलेक्टोरल कॉलेज प्रक्रिये मुळे प्रत्येक राज्यास अध्यक्षीय निवडणुकीत प्रतिनिधित्व मिळते. अमेरिका हा ५० राज्यांचा (स्टेट्स) समुह आहे. म्हणुनच अमेरिकेस "युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका" संबोधतात. 

इलेक्टोरल कॉलेजमध्ये ५३८ प्रतिनिधींचा समावेश आहे. ह्या प्रतिनिधींना इलेक्टोर्स संबोधतात. प्रतिनिधींचे विभाजन प्रत्येक राज्यातील सेनेटर्स व काँग्रेसमन्स च्या संखे प्रमाणे केलेले जाते. उदाहरणार्थ, कॅलिफोर्निया राज्यात ५३ काँग्रेसमन्स व २ सेनेटर्स आहेत. तेव्हा कॅलिफोर्निया राज्यास ५५ इलेक्टोरल कॉलेज प्रतिनिधी प्राप्त आहेत. हि पद्धत वापरून प्रत्येक राज्याला त्या राज्यातील सेनेटर्स व काँग्रेसमन्स च्या संखे प्रमाणे इलेक्टोरल कॉलेजचे प्रतिनिधी म्हणजेच इलेक्टोर्स मिळतात. अध्यक्ष म्हणुन निवडुन येण्यास २७० प्रतिनिधींची (इलेक्टोर्सची) मते प्राप्त करावी लागतात.

इलेक्टोरल कॉलेज प्रक्रिया: 
१) इलेक्टोर्स म्हणजेच प्रतिनिधी निवडणे
२) जनरल इलेक्शन नंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणे 
३) अंतिम निवड शिक्कमोर्तबी करिता सेनेटर्स आणि काँग्रेसमन्स च्या महासभेकडे पाठवणे  
 
१) इलेक्टोर्स म्हणजेच प्रतिनिधी निवडणे
इलेक्टोर्स निवडण्याचे कामकाज प्रत्येक राज्यावर सोपवलेले आहे. प्रत्येक राज्यातील राजकीय पक्ष, राज्याच्या नियमांनुसार प्रतिनिधी (इलेक्टोर्स) निवडतात आणि पक्षाच्या अधिवेशनात सार्वजनिक निवडणुकी करिता प्रतिनिधी (इलेक्टोर्स) म्हणुन त्यांची नेमणुक करतात.
 
२) जनरल इलेक्शन नंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणे
नोव्हेंबर ३ रोजी होणाऱ्या सार्वजनिक निवडणुकी नंतर दहा दिवसांच्या कालावधीत सर्व ५३८ प्रतिनिधी (इलेक्टोर्स) बैठकी (मीटिंग) मध्ये एकत्रित येतात व ज्या उमेदवारांचे ते प्रतिनिधित्व करतायेत त्या उमेदवारास मत देतात. त्या नंतर प्रत्येक स्टेट त्यांच्या इलेक्टोरल कॉलेज मतदानांचे सर्टिफिकेशन सेनेटर्स व काँग्रेसमन्स च्या महासभेकडे अंतिम शिक्कामोर्तब करण्या करिता वॉशिंग्टनला पाठवून देतात.
 
३) निवडणुकीचे अंतिम शिक्कामोर्तब 
इलेक्टोरल कॉलेजच्या प्रतिनिधींचे (इलेक्टोर्सचे) मतदान पुर्ण झाल्या नंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सेनेटर्स आणि काँग्रेसमन्स च्या महासभेत इलेक्टोर्स ने केलेल्या मतांची मोजणी केली जाते. ज्या उमेदवारास २७० इलेक्टोरल मते प्राप्त झालेली आहेत, त्या उमेदवारास अधिकृतरित्या विजयी घोषित केले जाते. विजयी उमेदवार जानेवारी २० रोजी अध्यक्ष पदाची शपथविधी घेतो आणि व्हाईट हाऊस मध्ये प्रवेश करतो. 

इलेक्टोरल कॉलेज प्रतिनिधी (इलेक्टोर्स) कसे मतदान करतात?
लोकमत (पॉपुलर व्होट्स) व इलेक्टोरल कॉलेज व्होट्स ह्यांचे एकमेकांचे नातं आहे. लोकमतांचे (पॉपुलर व्होट्स) रूपांतर इलेक्टोरल कॉलेज मतां मध्ये केले जाते. उमेदवारास इलेक्टोरल कॉलेजच्या मतांचे वाटप त्याला प्रत्येक राज्यातील मिळालेल्या लोकमतां नुसार करतात.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political story in the context of the US election