गरीब देशांनाही कोरोना लस वेळेत मिळणार; ‘युनिसेफ’ने घेतली मोठी मोहीम हाती

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 7 September 2020

युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड (युनिसेफ) ही लस खरेदी करणारी जगातील सर्वांत मोठी संस्था आहे.

न्यूयॉर्क- कोरोना विषाणूविरोधातील लस तयार झाल्यावर जगातील सर्व देशांना ती वेळेवर मिळावी यासाठी या संभाव्य लसींची खरेदी आणि वितरण करण्यात पुढाकार घेणार असल्याचे ‘युनिसेफ’ या संस्थेने जाहीर केले आहे. अशाप्रकारची ही जगातील सर्वांत मोठी आणि वेगवान मोहिम असेल, असेही सूत्रांनी सांगितले. 

युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड (युनिसेफ) ही लस खरेदी करणारी जगातील सर्वांत मोठी संस्था आहे. ही संस्था दरवर्षी नियमित उपचारांसाठी विविध लसींचे दोन अब्ज डोस खरेदी करते आणि जवळपास शंभर देशांमध्ये या लसींचा वापर होतो. जगातील अनेक संस्था लसनिर्मितीच्या अंतिम टप्प्यात आहेत. अनेक देशांनी या संस्थांबरोबर करारही केले आहेत. मात्र, गरीब देशांतील नागरिकांना लस वेळेवर मिळावी, यासाठी ‘युनिसेफ’ प्रयत्नशील आहे. ही संस्था ‘पॅन अमेरिका हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या सहकार्याने लस खरेदी आणि वितरणात पुढाकार घेणार आहे. या लसींचे वितरण प्रामुख्याने कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या ९२ देशांमध्ये केले जाणार आहे. याशिवाय ८० श्रीमंत देशांमध्येही लसीच्या वितरणात ‘युनिसेफ’ समन्वयाची भूमिका निभावणार आहे. त्यामुळे जगभरातील १७० हून अधिक देशांचा समावेश असलेली ही प्रक्रिया जगातील सर्वांत मोठी ठरण्याचा अंदाज आहे. कोव्हॅक्स फॅसिलिटी या संस्थेच्या माध्यमातून हा सर्व उपक्रम राबविला जाणार आहे. 

अखेर प्रतिक्षा संपली; रशियाची कोरोना लस याच आठवड्यात सर्वसामान्यांसाठी उपलब्ध

या संस्थांचे मिळणार सहकार्य 

जागतिक आरोग्य संघटना, गॅव्ही लस आघाडी, ‘सेपी’, ‘पाहो’, जागतिक बँक, बिल अँड मेलिंडा गेट्‌स फौंडेशन, पॅन अमेरिका हेल्थ ऑर्गनायझेशन या संस्थांचे सहकार्य घेतले जाणार आहे. जवळपास २८ लस उत्पादकांनी त्यांच्या लसीबाबतचा अहवाल आणि उत्पादनाचे नियोजन जाहीर केले आहे. पुढील एक-दोन वर्षांत लसींचे संयुक्तपणे उत्पादन करण्यासही काही कंपन्या तयार आहेत. मात्र, यासाठी लागणारी प्रचंड गुंतवणूक ही लसींचे अंतिम टप्प्यातील प्रयोग, त्यांची यशस्वीतता आणि संबंधित कंपन्यांनी केलेले करार यावर अवलंबून असल्याचा इशारा उत्पादकांनी दिला आहे. 

आम्ही नवीन आव्हान स्वीकारण्यास सज्ज आहोत. कोरोनाविरोधातील लसीचा जगभरात पुरवठा करण्यासाठी आणि हे संकट दूर करण्यासाठी आम्ही पुढाकार घेत आहोत. आम्ही दरवर्षी शंभरहून अधिक देशांच्यावतीने दोन अब्ज लसी विकत घेतो. आमच्यावर अनेक देशांचा विश्‍वास असल्यानेच आम्हाला लसींचा पुरवठा करण्याचा प्रचंड अनुभव मिळाला आहे, असं  युनिसेफने म्हटलंय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poor countries will also get the corona vaccine in time UNICEF initiative