मध्यरात्री अख्ख्या पाकिस्तानातील बत्ती गुल; #blackout ट्विटरवर ट्रेंड

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 January 2021

एकावेळी संपूर्ण पाकिस्तानमध्ये याप्रकारची घटना घडणे लज्जास्पद असल्याने काही वेळातच ट्विटरवर ब्लॅकआऊट हा हॅश्टॅग ट्रेंड होऊ लागला.

कराची : ट्विटरवर काल रात्री अचानकच #blackout हा हॅश्टॅग ट्रेंड होताना दिसून आला. याचं कारण असं की पाकिस्तानमध्ये अचानकच अनेक शहरांमध्ये बत्ती गुल झाली होती. काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे पाकिस्तानमध्ये शनिवारी रात्री अचानकच एकावेळी वीज गेली. कराची, इस्लामाबाद, लाहोर, पेशावर आणि रावळपिंडीसहीत अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये वीज गेल्यामुळे अंधार पसरला. एकावेळी संपूर्ण पाकिस्तानमध्ये याप्रकारची घटना घडणे लज्जास्पद असल्याने काही वेळातच ट्विटरवर ब्लॅकआऊट हा हॅश्टॅग ट्रेंड होऊ लागला.

या बाबतीत अद्यापतरी कसलीही तांत्रिक माहिती दिली गेली नाहीये. मात्र पाकिस्तानच्या उर्जा मंत्रालयाने ट्विटरवर याबाबतची सुचना दिली. मंत्रालयाने म्हटलं की पॉवर ट्रान्समिशन सिस्टीमच्या फ्रिक्वेन्सीमध्ये 50 पासून 0 पर्यंतची घट झाल्याने हा देशव्यापी ब्लॅकआऊट झाला आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हा टेक्निकल प्रॉब्लेम रात्री 11 वाजून 41 मिनिटांनी उद्भवला. मंत्रालयाने पाकिस्तानातील नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले. 

दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचे सहाय्यक शाहबाज गिल यांनी म्हटलं की उर्जा मंत्री उमर अयूब आणि त्यांची पूर्ण टीम या ब्रेकडाऊनवर काम करत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2015 च्या जानेवारीमध्ये देखील याचप्रकाची घटना पाकिस्तानमध्ये घडली होती. पाकिस्तानमध्ये टेक्निकल अडचणींमुळे अनेक तासांपर्यंत वीज नसल्याने खोळंबा झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साधारण दोन वाजता काही शहरांमध्ये वीज परतली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Power blackout reported in multiple cities of Pakistan