बायडेन यांनी नोकऱ्या घालवल्या; सार्वजनिक सभेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप

पीटीआय
Monday, 12 October 2020

कृष्णवर्णीय आणि लॅटिन अमेरिकी नागरिकही समाजवादाकडे पाठ फिरवत असून ते रिपब्लिकन सरकारच्या धोरणांना ते पाठिंबा देत आहेत,’ असा दावा ट्रम्प यांनी केला. बायडेन यांनी अमेरिकी जनतेची फसवणूक केली आहे.

वॉशिंग्टन - ज्यो बायडेन यांनी त्यांच्याकडील विविध पदांचा वापर करून अमेरिकी तरुणांच्या नोकऱ्या घालवून त्या चीनला आंदण म्हणून देण्याचे काम केले, असा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला. तर, डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या बायडेन यांनीही प्रत्युत्तर देताना ट्रम्प यांच्यामुळे अमेरिकी लोक बेरोजगार झाले, अशी टीका केली.

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने ट्रम्प आणि बायडेन यांच्यादरम्यानच्या आरोप-प्रत्यारोपांना जोर चढला आहे. ट्रम्प यांनी आज ‘व्हाइट हाऊस’मधूनच जनतेशी संवाद साधला. ‘बायडेन हे अमेरिकेला समाजवादाकडे नेत आहेत. मी असे कधीही होऊ देणार नाही. सिनेटर आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष असण्याच्या काळात बायडेन यांनी अमेरिकी युवकांना मिळू शकणाऱ्या नोकऱ्या चीनमध्ये घालविण्यात धन्यता मानली. त्यांचा हा समाजवाद रोखण्यासाठी आपण मोठ्या सभा घेऊ. कृष्णवर्णीय आणि लॅटिन अमेरिकी नागरिकही समाजवादाकडे पाठ फिरवत असून ते रिपब्लिकन सरकारच्या धोरणांना ते पाठिंबा देत आहेत,’ असा दावा ट्रम्प यांनी केला. बायडेन यांनी अमेरिकी जनतेची फसवणूक केली आहे. गेली पन्नास वर्षे डेमोक्रॅटिक पक्ष हेच काम करत आहे, असा आरोपही ट्रम्प यांनी केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ट्रम्प हे स्वार्थी : बायडेन
पेनसिल्वानिया येथील प्रचारसभेत ज्यो बायडेन यांनी ट्रम्प यांना प्रत्युत्तर दिले. ट्रम्प हे अत्यंत स्वार्थी असून ते केवळ श्रीमंत आणि अब्जाधीशांचे हितसंबंध जपत आहेत, अशी टीका बायडेन यांनी केली केली. त्यांनी अध्यक्षपदाची कारकिर्द सुरु करताना जितक्या नोकऱ्या होत्या त्यापेक्षा कमी नोकऱ्या सध्या आहेत, असा ‘विक्रम’ करणारे ट्रम्प हे पहिलेच अध्यक्ष ठरणार आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुक्तीनंतरचे पहिले भाषण
कोरोना संसर्गातून मुक्त झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आज पहिलेच भाषण होते. त्यामुळे समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. या स्वागतामुळे उत्साह संचारलेल्या ट्रम्प यांनी समर्थकांचे आभार मानताना त्यांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया यांना कोरोना संसर्ग झाल्याचे गेल्या आठवड्यात स्पष्ट झाल्यानंतर या दोघांनी चार दिवस लष्करी रुग्णालयात उपचार घेतले. आता ट्रम्प यांच्यापासून कोंणालाही संसर्ग होण्याचा धोका नाही, असे डॉक्टरांनी जाहीर केले आहे.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: President Donald Trump allegation at a public meeting