माझ्याविरोधात महाभियोग हा लोकशाही उद्‌ध्वस्त करण्याचा डाव : ट्रम्प 

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

ट्रम्प यांनी वैयक्तिक आणि राजकीय लाभासाठी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला. तसेच, त्यांनी आपले विरोधक जो बिडेन आणि त्यांच्या मुलाच्या विरोधात एका युक्रेनियन गॅस कंपनीतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी युक्रेनवर दबाव आणला होता, असे आरोप ठेवण्यात आले आहेत.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगाच्या प्रस्तावावर आज (बुधवार, स्थानिक वेळेनुसार) अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधिगृहात मतदान होण्यापूर्वी ट्रम्प यांनी सभापती नॅन्सी पेलोसी यांना खरमरीत पत्र लिहिले असून, त्यात तिखट शब्दांत टीका केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाभियोगाचा हा प्रस्ताव म्हणजे अमेरिकेच्या लोकशाहीला उद्ध्वस्त करण्यासाठीचा हल्ला आहे. हा अमेरिका आणि डेमोक्रेटिक पक्षावर हल्ला आहे, अशा शब्दांत ट्रम्प यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. पेलोसी यांना ट्रम्प यांनी पाच पानी पत्र लिहिले आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही अमेरिकेला यातना भोगायला लावत आहात, असा आरोपही ट्रम्प यांनी पेलोसी यांच्यावर केला आहे. महाभियोग चालणारे ट्रम्प हे अमेरिकेचे तिसरे अध्यक्ष आहेत.

माझ्या नेतृत्वाखाली अमेरिकेने चांगली प्रगती केली असून, मी कुठलीही चुकीची गोष्ट केलेली नाही. त्यामुळे माझ्या विरोधात महाभियोगाची कारवाई करणे चुकीचे आहे. कट्टरवादी डावे, काहीही न करणारे डेमोक्रॅटिक नेते यांनी माझ्या विरोधात द्वेष मोहीम उघडली आहे. ही बाब अमेरिकेसाठी अतिशय लाजिरवाणी आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

‘कूलिंग ऑफ पिरीअड’मुळे टळताहेत घटस्फोट

ट्रम्प यांच्या विरोधात दोन आरोप ठेवत अमेरिकी संसदेच्या महत्त्वाच्या समितीने त्यांच्यावरील महाभियोगाच्या कारवाईला परवानगी दिली आहे. ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोगाची कारवाई आता अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधिगृहात पोचली आहे. प्रतिनिधिगृहात विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाकडे बहुमत आहे. प्रतिनिधिगृहाची मंजुरी मिळाल्यानंतर महाभियोगाच्या प्रक्रियेवर सिनेटमध्ये सुनावणी होईल. शंभर सदस्यसंख्या असलेल्या सिनेटमध्ये मात्र सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आहे. त्यामुळे प्रतिनिधिगृहाने मंजुरी दिली तरी सिनेटमध्ये ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोगाची कारवाई फेटाळून लावली जाऊ शकते, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

अमेरिकी संसदेच्या न्याय समितीने ट्रम्प यांच्याविरोधात सुरू असलेल्या महाभियोग खटल्यातील दोन आरोपांना मान्यता दिली होती. ट्रम्प यांनी वैयक्तिक आणि राजकीय लाभासाठी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला. तसेच, त्यांनी आपले विरोधक जो बिडेन आणि त्यांच्या मुलाच्या विरोधात एका युक्रेनियन गॅस कंपनीतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी युक्रेनवर दबाव आणला होता, असे आरोप ठेवण्यात आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: President Donald Trump Impeached By US House For Abuse Of Power, Obstruction Of Congress