
जगभरात भुकेच्या समस्येने घेतले विक्राळ रुप; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल
न्यूयॉर्क - जागतिक पातळीवर भुकेची समस्या असणाऱ्यांच्या संख्येत २०२१ मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे संयुक्त राष्ट्रांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या पाच संस्थांनी मिळून हा अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार जगभरातील २३० कोटी लोकांना अन्नधान्याच्या मध्यम किंवा तीव्र स्वरूपाच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे हा अहवाल रशिया-युक्रेन युद्धाआधीच्या सर्वेक्षणावर आधारित आहे.
कोरोना काळात अन्नधान्यांच्या वाढलेल्या किमतीमुळे जगभरात पोषक आहार घेऊ न शकणाऱ्यांची संख्या ११ कोटी १२ लाखांवरून तीनशे दहा कोटींवर पोहोचल्याचे या अहवालात म्हटले आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे जगभरातील पुरवठा साखळीवर परिणाम झाला असून खतांच्या आणि इंधनाच्या किमती वाढल्या आणि त्याच्या परिणामस्वरूप २०२२ च्या पहिल्या सहामाहीत अन्नधान्यांच्या किमती अधिक वाढल्या. त्याचप्रमाणे सातत्याने हवामानात होणारे तीव्र बदल देखील ही पुरवठा साखळी खंडित करण्यास कारणीभूत ठरत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
आर्थिकदृष्ट्या मागास देशांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे, असे देखील या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालातून अन्नटंचाईचा सामना करणाऱ्या स्त्रिया आणि पुरुष यांच्या प्रमाणात देखील मोठा फरक आढळून आला आहे आहे. हा फरक कोरोना काळात अधिक वाढला असल्याचे देखील निदर्शनास आले आहे. या सर्वेक्षणावरून डोळ्यासमोर उभे राहणारे चित्र अत्यंत भीषण असून अन्नटंचाई आणि कुपोषण नष्ट करण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न तोकडे पडत असल्याचे आणि आपला प्रवास उलट दिशेने सुरु असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.
तातडीने उपाययोजना आवश्यक
या अहवालातून समोर आलेल्या आकडेवारीच्या आधारावर आगामी काळात येऊ शकणाऱ्या तीव्र अन्नटंचाईचे आणि भूकबळीचे भविष्य स्पष्टपणे दिसत असून जागतिक नेत्यांनी आतापासूनच त्यावर प्रभावी उपाययोजना राबवणे आवश्यक असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी जागतिक स्तरावर, खाद्य उत्पादन आणि कृषी क्षेत्रातील उत्पादन प्रक्रियेतील उत्पादनाप्रमाणेच, वाहतूक, उत्पादनांवरील प्रक्रिया, वितरण, जाहिरात या सर्वच क्षेत्रात सामान प्रमाणात गुंतवणूक आवश्यक असल्याचे या संस्थांनी म्हटले आहे.
‘यूएन’च्या अहवालानुसार
३४.५० कोटी : नागरिक भूकबळीच्या उंबरठ्यावर
५ कोटी : लोकांना तीव्र अन्नटंचाईची समस्या
९४.३० कोटी : अन्नटंचाईची समस्या असलेल्या नागरिकांत झालेली वाढ
४२.५० कोटी : अन्नटंचाई असलेले आशियातील नागरिक
Web Title: Problem Of Hunger Is Rampant All Over The World
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..