पुलवामा हल्ला इमरान खान यांच्या नेतृत्वातील मोठं यश; संसदेत पाक मंत्र्यानं दिली 'नापाक' इराद्याची कबुली

वृत्तसंस्था
Thursday, 29 October 2020

पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात 40 भारतीय जवान शहीद झाले होते. यानंतर भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक केला. भारताकडून करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकवर पाकिस्ताननं कायमच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मात्र पाकिस्तानच्या संसदेतच याबद्दलचा गौप्यस्फोट करण्यात आला.

इस्लामाबाद : जम्मू काश्मीर मधील पुलवामा हल्ल्यात पाक सरकारचा हात होता, अशी कबुली खुद्द इमरान खान सरकारमधील मंत्र्याने संसदेत दिली आहे. इमरान सरकार भारताला घाबरणारे सरकार आहे, असा आरोप पाकिस्तानच्या संसदेचे माजी अध्यक्ष अयाज सादिक यांनी केला होता. याला प्रत्युत्तर देताना पुलवामातील घटना ही पाक सरकारचे मोठे यश असल्याचे विधान पाकिस्तानचे मंत्री  फवाद चौधरी यांनी केले. अयाज सादिग यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना फवाद चौधरी म्हणाले की,  इमरान खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने भारतात घुसून हल्ला केला.

पुलवामामधील मिळालेलं यश हे इमारन खान यांच्या नेतृत्वाखाली मोठी कामगिरी आहे, असा उल्लेखही त्यांनी केला. पुलवामाच्या घटनेत आपल्या सर्वांचे योगदान असल्याचे मानतो, असे सांगत विरोधी पक्षाला उत्तर देताना पुलवामा हल्ल्यात पाक सरकारचा हात असल्याची कबुलीच दिली. एएनआयने यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. फवाद चौधरी यांच्या संसदेतील वक्तव्याने इमरान सरकारला आणखी एकदा तोंडावर आपटण्याची वेळ येऊ शकते.    

पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात 40 भारतीय जवान शहीद झाले होते. यानंतर भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक केला. भारताकडून करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकवर पाकिस्ताननं कायमच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मात्र पाकिस्तानच्या संसदेतच याबद्दलचा गौप्यस्फोट करण्यात आला. भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानला थेट हल्ल्याची भीती वाटत होती, असं पाकिस्तानच्या संसदेचे माजी अध्यक्ष अयाज सादिक यांनी म्हटलं होते. त्यांना उत्तर देताना पाकने भारतात घुसून हल्ला केला, असे वक्तव्य फवाद खान यांनी केलं.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pulwama was a great achievement under Imran Khans leadership says Pakistans Minister Fawad Choudhry