Queen Elizabeth II : राणी एलिझाबेथ यांनी घेतली चिरविश्रांती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Queen Elizabeth II Burial at Windsor Castle funeral live updates king charles iii royal family

Queen Elizabeth II : राणी एलिझाबेथ यांनी घेतली चिरविश्रांती

लंडन : जगात सर्वाधिक काळ सत्ता गाजविलेल्या सत्ताधीश म्हणून इतिहासात नोंद झालेल्या ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी आज विंडसर येथे त्यांचे पती फिलीप यांच्याशेजारी चिरविश्रांती घेतली. यावेळी त्यांचे पुत्र राजे चार्ल्स तिसरे, राणी कॅमिला, राजघराण्यातील इतर सदस्य, जगभरातील नेते आणि ब्रिटनमधील लक्षावधी नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. भारताच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यावेळी उपस्थित होत्या.

राणी एलिझाबेथ यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी आठ सप्टेंबरला निधन झाले. त्यानंतर दहा दिवस, राजे चार्ल्स यांनी म्हटल्याप्रमाणे एलिझाबेथ यांची ‘ग्रेट जर्नी’ (अंतिम प्रवास) सुरु होती. जनतेला अंत्यदर्शन घेता यावे म्हणून लंडनमध्ये वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये चार दिवस त्यांचा मृतदेह ठेवण्यात आला होता. यावेळी हजारो जणांनी अनेक तास रांगेत उभे राहून एलिझाबेथ यांना श्रद्धांजली वाहिली होती.

आज सकाळी नऊशे वर्ष जुन्या वेस्टमिन्स्टर हॉलची दारे नागरिकांना बंद करण्यात येऊन अंत्ययात्रेची तयारी सुरु करण्यात आली. त्यांचा मृतदेह वेस्टमिन्स्टर ॲबे येथे नेण्यात आला. यावेळी राणी एलिझाबेथ यांचेच नाव दिलेल्या एलिझाबेथ टॉवरमधील ‘बिग बेन’ घड्याळात त्यांच्या ९६ वर्षांच्या जीवनप्रवासाची आठवण म्हणून ९६ टोल वाजविण्यात आले. राजे चार्ल्स हे अंत्ययात्रेत सर्वांत पुढे होते.

प्रार्थना सभेचे आयोजन

भव्य आणि प्राचीन अशा वेस्टमिन्स्टर ॲबेमध्ये प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. येथे रेव्हरंड डॉ. डेव्हिड हॉयल यांच्या नेतृत्वाखाली उपस्थितांनी राणी एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. सुमारे तासभर चाललेल्या प्रार्थनेवेळी बायबलमधील ओळी वाचण्यात आल्या आणि काही विशेष धुन वाजविण्यात आल्या. ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनीही बायबलमधील ओळींचे वाचन केले.

मुख्य भागातून अंत्ययात्रा

स्थानिक वेळेनुसार, सकाळी ११ च्या ठोक्याला देशभरात दोन मिनिटांची शांतता पाळून नंतर अंत्ययात्रेला सुरुवात झाली. अत्यंत कडक शिस्तीत, शांततापूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात ही अंत्ययात्रा सुरु झाली. राजघराण्याची चिन्हे असलेल्या कापडात गुंडाळलेली राणी एलिझाबेथ यांची शवपेटी नौदलाच्या १४२ सैनिकांनी उचलून तोफेच्या गाडीवर ठेवली. त्यानंतर शवपेटीच्या मागे राजघराण्यातील सदस्य आणि पारंपरिक सैनिकी वेशातील सुमारे सहा हजार सैनिक आणि घोडदळासह कमालीच्या शिस्तबद्ध पद्धतीने लंडनच्या मुख्य भागातून ही अंत्ययात्रा जात वेलिंग्टन आर्क येथे आली. तेथून शवपेटी विशेष गाडीमध्ये ठेवून ती विंडसर येथे आणण्यात आली. येथे राणी एलिझाबेथ यांच्या दफनविधी करण्यात आला. ब्रिटनसह जगातील अनेक देशांचे प्रमुखपद भूषविलेल्या, अनेक बदलांच्या साक्षीदार ठरलेल्या आणि आपल्या जनतेसाठी आदर्शवत ठरलेल्या ब्रिटनच्या या सम्राज्ञीने त्यांचे पती फिलीप यांच्याशेजारीच चिरविश्रांती घेतली.

एलिझाबेथ यांच्या निधनामुळे जगभरात एक मोठी आणि कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे ७० वर्षे मार्गदर्शन मिळाले, हे सर्वांचे भाग्य आहे. त्यांचे निधन झाले असले तरी त्या स्मृतिरुपाने कायम असतील.

- ज्यो बायडेन, अध्यक्ष, अमेरिका

अशी झाली अंत्ययात्रा

  • तोफेच्या गाडीवरून मृतदेह लंडनच्या मुख्य भागांतून नेला

  • एडवर्ड सातवे, पंचम जॉर्ज, जॉर्ज सहावे आणि माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या अंत्ययात्रेसाठीही तोफेच्या गाडीचा

  • वापर करण्यात आला होता.

  • राजे चार्ल्स तिसरे आणि राजघराण्यातील इतर सर्व सदस्य संपूर्ण अंत्ययात्रेत दोन किलोमीटरपर्यंत चालत सहभागी

  • लंडनच्या बाहेर विंडसर पॅलेस येथे दफन, यावेळी तोफांची मानवंदना

विवाह, राज्यारोहण आणि अंतिम प्रार्थना

प्रार्थना सभेवेळी जागतिक नेते आणि इतर प्रतिष्ठीत लोक लंडनमधील नऊशे वर्ष जुन्या वेस्टमिन्स्टर ॲबे येथे हजर. याच ठिकाणी राणीचा विवाह झाला आणि राज्यारोहण समारोहही झाला होता. यावेळी राजघराण्याच्या बँडपथकाने ‘द लास्ट पोस्ट’ ही धुन वाजविली. यानंतर संपूर्ण ब्रिटनमध्ये दोन मिनिटे शांतता पाळण्यात आली. आणि नंतर राष्ट्रगीत म्हणण्यात आले.

शवपेटीवर कोळी

राणी एलिझाबेथ यांची अंत्ययात्रा सुरू असताना फुलांनी सजविलेल्या शवपेटीवर एक हिरव्या रंगाचा कोळी फिरताना कॅमेरातून टिपला गेला. राजे चार्ल्स यांनी त्यांच्या आईबद्दलच्या भावना एका कार्डवर लिहिल्या होत्या, त्यावर हा कोळी फिरत होता. सोशल मीडियावर यावरून प्रचंड चर्चा झाली.

विंडसर येथेही प्रचंड गर्दी

एलिझाबेथ यांच्या अंत्ययात्रेसाठी विंडसर कॅसल येथे दोन ते तीन हजार लोक उपस्थित असणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र येथे हजारो लोक आले होते. लंडन शहरापासून विंडसर कॅसल २२ किलोमीटर अंतरावर आहे. या मार्गावरही नागरिक उभे होते.

Web Title: Queen Elizabeth Ii Burial At Windsor Castle Funeral Live Updates King Charles Iii Royal Family

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :familyglobal news