पाकिस्तानमध्ये पावसाचा कहर; गेल्या तीन दिवसात ९० जणांचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 26 August 2020

आर्थिक राजधानी असलेल्या कराचीमध्ये नाले भरून वाहू लागल्याने अनेक रस्ते आणि घरांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी शिरले आहे.

इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये पावसाने कहर माजविला असून गेल्या तीन दिवसांत किमान ९० जणांना प्राण गमवावे लागले आहेत. देशभरात जवळपास एक हजार घरांचे नुकसान झाले आहे. आर्थिक राजधानी असलेल्या कराचीमध्ये नाले भरून वाहू लागल्याने अनेक रस्ते आणि घरांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी शिरले आहे. त्यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. सिंध प्रांतात पावासामुळे अधिक हानी झाली आहे. या आठवड्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

अफगाणिस्तानात 70 जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानात अनेक ठिकाणी आलेल्या पुरामुळे आतापर्यंत किमान ७० जणांचा मृत्यू झाला असून शंभरहून अधिक जण जखमी झाले आहेत. मोसमी पावसाने देशाच्या उत्तर आणि पूर्व भागाला झोडपून काढले आहे.

धक्कादायक! चीनने ट्रायल न घेताच महिनाभर आधी दिली लस

सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसामुळे अनेक घरे पडली आहे. येथे बचाव कार्य अद्याप सुरु असून ढिगाऱ्यांखाली आणखी काही जण दबले असण्याची शक्यता असल्याने मृतांची संख्या वाढू शकते. मृतांमध्ये लहान मुलांचे प्रमाणही अधिक असून जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. पारवान प्रांतात काल धुवाँधार पाऊस कोसळल्याने रात्रीतून पूर आला. यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. या प्रांताच्या अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. अध्यक्ष अश्रफ घनी यांनीही पारवान प्रांताकडे बचाव पथके रवाना केली आहेत. पुरामुळे अनेक महामार्गांवर पाणी आल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत. शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rainstorms in Pakistan 90 killed in last three days