कोरोनामुळे पुरुषांना मृत्यूचा अधिक धोका;महिलांपेक्षा ३० टक्के जास्त जोखीम

पीटीआय
Monday, 21 December 2020

पुरुषांना महिलांपेक्षा कोरोनामुळे मृत्यूचा ३० टक्के अधिक धोका असल्याचा दावा एका ताज्या संशोधनात केला आहे. कोरोना रुग्णांची वैद्यकीय स्थिती व मृत्यूच्या धोक्याबाबत विश्लेषण करण्यात आले.

बोस्टन - जगाला कोरोना लशीचे वेध लागले असले तरी कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपण टळलेला नाही. एकाच वयाच्या व सारखीच आरोग्य स्थिती असणाऱ्या पुरुषांना महिलांपेक्षा कोरोनामुळे मृत्यूचा ३० टक्के अधिक धोका असल्याचा दावा एका ताज्या संशोधनात केला आहे. कोरोना रुग्णांची वैद्यकीय स्थिती व मृत्यूच्या धोक्याबाबत विश्लेषण करण्यात आले. अमेरिकेतील युनिव्हिर्सिटी ऑफ मेरीलॅंड स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी हे संशोधन केले. ते ‘क्लिनिकल इन्फेक्शिअस डिसीज’ या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संशोधकांनी अमेरिकेतील ६१३ रुग्णालयांमधील ६७ हजार कोरोना रुग्णांचा अभ्यास केला. कोरोनामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पुरुष रुग्णाला लठ्ठपणा,उच्च रक्तदाब, मधुमेह आदी आजार असतील तर हेच आजार असलेल्या महिला रुग्णाच्या तुलनेत मृत्यूची शक्यता ३० टक्के अधिक आहे, असा संशोधकांचा दावा आहे. त्याचप्रमाणे, २० ते ३९ या वयोगटातील हे आजार असलेल्या रुग्णांना याच वयोगटातील इतर रुग्णांपेक्षा मृत्यूचा धोका अधिक आहे. त्यामुळे, केवळ मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या ज्येष्ठच नव्हे तर तरुणांमध्येही कोरोना गुंतागुंत निर्माण करू शकतो. वैद्यकीय तज्ज्ञांना नेमक्या कोणत्या कोरोना रुग्णांना ॲंटीबॉडी उपचाराचा फायदा होऊ शकतो, हे ठरविण्यासाठीही हा धोका लक्षात घ्यावा. संसर्गाच्या सुरवातीलाच ॲंटीबॉडी उपचार दिल्यास रूग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची शक्यताही कमी होऊ शकते, असेही संशोधकांचे म्हणणे आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ज्येष्ठांबरोबर तरुणांनाही धोका
कोरोनाचा मृत्यूदर वयाबरोबर वाढतो. अमेरिकेतील विविध रुग्णालयांत दाखल एकूण रुग्णांपैकी १९ टक्के रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. लहान मुलांमध्ये हा मृत्यूदर सर्वांत कमी म्हणजे दोन टक्के होता तर ८० वर्षांहून अधिक वयाच्या रुग्णांमध्ये तो सर्वाधिक ३४ टक्के होता. मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या वृद्ध रुग्णांना मृत्यूचा धोका अधिक असला तरी हेच आजार असलेल्या तरुणांचाही कोरोनामुळे मृत्यू ओढवू शकतो, असे प्रमुख संशोधक कॅथरिन गुडमन यांनी सांगितले.

अमेरिकेतील  ६१३ रुग्णालयांमधील ६७ हजार कोरोना रुग्णांचा अभ्यास.
२० ते ३९ या वयोगटातील उच्च रक्तदाब, मधुमेह असलेल्या तरुणांनाही मृत्यूचा धोका

कोरोनाच्या जागतिक साथीत या आजाराबद्दलचे ज्ञान आपल्याला सक्षम बनवू शकते. रुग्णालयात दाखल केलेल्या कोणत्या रुग्णांना मृत्यूचा अधिक धोका आहे, हे समजून घेतल्यास उपचारासंबंधीचे अवघड निर्णय घेण्यात मदत मिळू शकते.
- ॲंथोनी डी. हॅरिस, संशोधक

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Research in the United States Corona increases the risk of death in men