बंदिस्त जागेत अधिक काळ बोलणे टाळा!

वृत्तसंस्था
Friday, 22 January 2021

बोलत असताना मास्क लावला नसल्यास बाहेर पडणारे सूक्ष्म जलकण वेगाने पसरतात आणि हवेत टिकतात. त्यामुळे तुम्ही बंदिस्त जागेत एकमेकांपासून लांब अंतरावरही बसला असाल तरी संसर्गाचा धोका असू शकतो.

लंडन : बंदिस्त जागांमध्ये कोरोना संसर्गाच्या धोक्याचे मूल्यमापन करण्यासाठी संशोधकांनी एक ऑनलाइन टूल शोधून काढले आहे. तसेच अशा बंदिस्त जागी मास्कशिवाय बसलेल्या दोन व्यक्ती एकमेकांशी बराच काळ बोलत बसल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याचा धोका अधिक असतो, असे संशोधकांनी अधोरेखित केले आहे. एखादी व्यक्ती खोकल्यास निर्माण होणाऱ्या धोक्यापेक्षा हा धोका अधिक असतो, असे संशोधकांनी सांगितले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘प्रोसिंडिंग ऑफ रॉयल सोसायटी’ या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. बंदिस्त जागेमध्ये संसर्ग वेगाने पसरतो, हे या संशोधनाने ठळकपणे सांगितले आहे. अशा जागेत काही सेकंदांमध्येच विषाणू दोन मीटरहून अधिक पुढे जाऊन संसर्ग पसरवितो, असे अहवालात म्हटले आहे. केंब्रिज विद्यापीठ आणि इंपेरिअल कॉलेज येथील संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. अहवालानुसार, बोलत असताना छोट्या आकाराचे जलकण बाहेर पडतात आणि खोलीत पसरतात. या ठिकाणी खेळती हवा नसेल तर ते कण बराच काळ हवेत राहतात. याउलट, खोकल्याद्वारे बाहेर येणाऱ्या जलकणांचा आकार मोठा असतो आणि ते लवकर पृष्ठभागावर बसतात. आतापर्यंत पसरलेल्या संसर्गापैकी बंदिस्त जागांमध्ये पसरलेल्या संसर्गाचे प्रमाण मोठे आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मास्क ठरतो उपयुक्त 
बोलत असताना मास्क लावला नसल्यास बाहेर पडणारे सूक्ष्म जलकण वेगाने पसरतात आणि हवेत टिकतात. त्यामुळे तुम्ही बंदिस्त जागेत एकमेकांपासून लांब अंतरावरही बसला असाल तरी संसर्गाचा धोका असू शकतो. मात्र मास्क परिधान केला असल्यास श्‍वासोच्छ्‌वासाचा वेग आपोआप कमी होऊन संसर्गग्रस्त जलकणही अडविले जातात. त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता कमी होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Researchers Avoid talking too long in a confined space

Tags
टॉपिकस
Topic Tags: