Ireland Riots : आयर्लंडची राजधानी पेटली! लहान मुलांवर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर शहरात दंगल अन् जाळपोळ

Ireland Knife Attack : यानंतर सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे.
Ireland Riots
Ireland RiotseSakal

Dublin Riots : आयर्लंडची राजधानी डबलिनमध्ये गुरुवारी एका शाळेबाहेर चाकू हल्ला झाला होता. यामध्ये तीन लहान मुलांसोबत पाच जण जखमी झाले होते. यानंतर शहरात सगळीकडे दंगल सुरू झाली. यानंतर सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसंच नागरिकांना अत्यंत आवश्यक असल्याशिवाय बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

चाकू हल्ला प्रकरणी पोलिसांनी एका 40 वर्षांच्या व्यक्तीला अटक केली आहे. तसंच, याबाबत अधिक तपास सुरू आहे. ही व्यक्ती एक आयरिश नागरिक असल्याचं वृत्त समोर आल्यानंतर, शहरातील स्थलांतर-विरोधी संघटनांनी रस्त्यावर उतरुन निदर्शने सुरू केली. पोलिसांनी त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यात आणि पोलिसांमध्ये वाद झाला, आणि त्यानंतर दंगल सुरू झाली.

या दंगलीमध्ये बऱ्याच ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. एक डबल डेकर बस पेटवल्याची घटना घडली आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या हॉलिडे इन हॉटेल आणि मॅकडॉनल्डच्या काचा देखील फोडण्यात आल्या. जवळच्या एका दुकानात लूटमार झाली. यासोबतच एक पोलीस व्हॅन देखील जाळण्यात आली आहे.

Ireland Riots
Israel-Hamas War : 13 इस्रायली ओलीसांची आज सुटका, आजपासून लागू होणार युद्धविराम

याबाबत बोलताना पोलीस आयुक्त ड्र्यू हॅरिस म्हणाले, "ही दृश्ये लाजिरवाणी आहेत. आमच्यातील नागरिकांचा एक गट अत्यंत उजव्या विचारसरणीने प्रेरित आहे. यामध्ये गुंडांचा समावेश आहे. हा संपूर्ण गट गंभीर हिंसाचारात गुंतलेला आहे." कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण 400 अधिकारी तैनात केल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

मुलांवर झालेला चाकूहल्ला हा दहशतवादी हल्ला होता का, असं विचारलं असता हॅरिस म्हणाले, की "मी याबाबत कोणताही अंदाज लावणार नाही. जोपर्यंत आम्हाला या हल्ल्यामागच्या हेतूबाबत खात्रीशीर माहिती मिळत नाही, तोपर्यंत हे का घडले याबाबत काहीही सांगता येणार नाही."

दरम्यान, देशाचे न्याय मंत्री हेलन मॅकेंटी यांनीदेखील ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. "देशातील नागरिकांचा एक छोटासा वर्ग, ज्यांचा उद्देश केवळ अराजकता माजवणे आहे, तोच या हिंसाचाराचा भाग आहे. जाळपोळ करणारे लोक ना स्थलांतर-विरोधी आहेत, ना त्यांना जखमी मुलांबद्दल काही करायचं आहे. ते गुन्हेगार आणि ठग आहेत, जे सिटी सेंटरमध्ये येऊन लहान मुलांवर झालेल्या भयानक हल्ल्याचा आपल्या फायद्यासाठी वापर करत आहेत." असं ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com