जपानमध्ये रोबो पुजारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

तरुणांना आकर्षित करण्यासाठी जपानमधील एका ४०० वर्ष जुन्या बौद्ध मंदिरात पुजारी म्हणून नुकतीच एका रोबोची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता मंदिरातील पुजेसह, धर्मप्रसाराचे कामही सोपे होणार आहे.

टोकीयोः आपली दैनंदिन कामे करणारा, अगदी वेळप्रसंगी आपल्याशी खेळणारा रोबो असतो हे आपल्याला माहितीये. पण एखाद्या मंदिरात पुजारी म्हणून काम करणाऱ्या रोबोबद्दल तुम्ही कधी ऐकलंय? बहुदा नसेलच. होय, तरुणांना आकर्षित करण्यासाठी जपानमधील एका ४०० वर्ष जुन्या बौद्ध मंदिरात पुजारी म्हणून नुकतीच एका रोबोची नियुक्ती करण्यात आली आहे. तंत्रज्ञानात वेगाने होणाऱ्या प्रगतीमुळे रोबोच्या माध्यमातून कोणती कामे करता येतील सांगता येत नाही. त्यामुळे आता मंदिरातील पुजेसह, धर्मप्रसाराचे कामही सोपे होणार आहे.

जपानच्या क्योटो शहरातील कोदाइजी मंदिरात हा पुजारी रोबो ठेवण्यात आला आहे. या रोबोचे नाव कैनन असून, तो मंदिरात येणाऱ्या लोकांना प्रेम, करुणा यांची शिकवण देतो. तर राग, क्रोध, अहंकार यांसारख्या वाईट गोष्टींपासून दूर राहण्याचीही शिकवण देतो. या रोबोटचा चेहरा, हात, खांदे हे अगदी मानवी त्वचेशी साधर्म असणाऱ्या सिलिकॉनपासून बनवण्यात आले आहे. कैनन आपले दोन्ही हात जोडून अगदी कोमल आवाजात प्रार्थनाही करतो. या मंदिरातील पुजारांचे म्हणणे आहे की, कैनन हा स्वतःमध्ये कालानुरुप आवश्यक ते बदल करु शकतो. 

या रोबोला मंदिरात पुजारी म्हणून ठेवण्यावरुन वादही उभा राहिला होता. मात्र, त्यानंतरही या पुजारी रोबोला मंदिरात ठेवण्यात आले आहे. ओसाका यूनिव्हर्सिटीचे प्रख्यात रोबोटिक्स प्रोफेसर हिरोशी इशीगुरो आणि जैन मंदिर यांच्या सहयोगाने १० लाख रुपयांच्या खर्चातून या रोबोची निर्मिती करण्यात आली आहे. जपानमधील तरुणांमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार-प्रसाराचे काम कैननमुळे आता सोपे होणार असल्याचे मंदिरातील स्थानिक पुजारांचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robot Priest in Japan