esakal | ईद नमाजावर 'तालिबानी' दहशत; राष्ट्रपती भवनाजवळ 3 रॉकेट डागले
sakal

बोलून बातमी शोधा

taliban

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये राष्ट्रपती भवनजवळ तीन रॉकेट डागण्यात आले आहेत. अमेरिकेने सैन्य वापसीची घोषणा केल्यापासून तालिबान अधिक सक्रिय झाला आहे.

ईद नमाजावर 'तालिबानी' दहशत; राष्ट्रपती भवनाजवळ 3 रॉकेट डागले

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

काबुल- अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये राष्ट्रपती भवनजवळ तीन रॉकेट डागण्यात आले आहेत. अमेरिकेने सैन्य वापसीची घोषणा केल्यापासून तालिबान अधिक सक्रिय झाला आहे. तालिबानने अफगाणिस्तानमधील अनेक प्रमुख शहरांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. ईदच्या नमाज पठणादरम्यान तीन रॉकेट राष्ट्रपती भवनाच्या जवळ येऊन पडले. काबुलच्या परवान भागातून तीन रॉकेट डागण्यात आले होते. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (Rockets landed near the Presidential Palace in downtown Kabul during Eid prayers Afghanistan)

31 ऑगस्टपर्यंत सर्व सैन्य परत बोलावणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी जाहीर केले. तेव्हापासून तालिबानला जास्त चेव असल्यासारखं दिसत आहे. तालिबानने अनेक भागांवर ताबा मिळवला आहे. तालिबानच्या दाव्यानुसार त्यांनी 80 टक्के भागावर कब्जा केलाय. राष्ट्रपती भवनाजवळ रॉकेट डागून तालिबानने सरकारला इशारा दिला आहे. हे तीन रॉकेट बाग-ए-अली मरदा , चमन-ए-हुजुरी आणि पोलीस डिस्ट्रिक्टजवळ जाऊन पडले आहेत. हल्ल्यामध्ये किती नुकसान झालंय याची माहिती मिळू शकलेली नाही. पण, ईदची नमाज पठण करत असताना राष्ट्रपती भवनाजवळ हे रॉकेट हल्ले करण्यात आले आहेत.

अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये वीस वर्षांपूर्वी सुरु केलेली लष्करी मोहिम ३१ ऑगस्टला संपविली जाईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आज जाहीर केले. तसेच, या संघर्षग्रस्त देशाची ‘राष्ट्र-उभारणी’ करण्यात रस नसल्याचेही बायडेन यांनी स्पष्ट केले.बायडेन यांनी राष्ट्रीय सुरक्षा संस्थांबरोबर बैठक घेत अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर चर्चा केली. यानंतर बोलताना बायडेन म्हणाले की, ‘अधिक हल्ले करण्यापासून तालिबानला रोखण्याचा आमचा उद्देश पूर्ण झाला आहे. त्यामुळे माघारी परतण्याची हीच वेळ आहे. आम्ही किती काळ तिथे राहिलो तरी त्यांचे अंतर्गत प्रश्‍न सोडवू शकत नाही. आमच्या सैनिकांच्या आणखी एका पिढीला अफगाणिस्तान युद्धात अडकविण्याची आमची इच्छा नाही. राष्ट्रउभारणी करण्यासाठी आम्ही अफगाणिस्तानात थांबण्याची गरज नाही. अफगाणिस्तानच्या जनतेनेच ही जबाबदारी स्वीकारणे आवश्‍यक आहे. त्यांना देश कसा हवा आहे, हे त्यांचे त्यांनी ठरवावे.’ अमेरिकेचे अफगाणिस्तानमधील ९० टक्के सैनिक माघारी आले आहेत.

११ सप्टेंबर, २००१ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये सुरु केलेली मोहिम ३१ ऑगस्टला संपणार आहे. या वीस वर्षांच्या काळात अमेरिकेने या मोहिमेसाठी एक हजार अब्ज डॉलर खर्च केले आहेत. दहशतवाद्यांविरोधात लढताना २४४८ सैनिकांचा मृत्यू झाला, तर २०,७७२ जण जखमी झाले आहेत

loading image