
..तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ
मॉस्को : रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष कायम असताना फिनलंडने ‘नाटो’मध्ये सहभागी होण्यासाठी आग्रही भूमिका घेतल्याने युरोपातील वातावरण तापले आहे. ‘वेळ आलीच तर आम्हाला देखील जशास तसे उत्तर द्यावे लागेल’ असे रशियाने म्हटले. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन प्रसिद्धीस दिले असून त्यात त्यांनी फिनलंडच्या भूमिकेमुळे द्विपक्षीय संबंधांना तडा जाईल तसेच उत्तर युरोपमधील शांतता आणि स्थैर्य देखील धोक्यात येईल असे म्हटले आहे.
तत्पूर्वी फिनलंडच्या पंतप्रधानांनी विनाविलंब ‘नाटो’च्या सदस्यत्वासाठी अर्ज करण्यात येईल असे म्हटले होते. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर फिनलंडने ‘नाटो’मध्ये सहभागी व्हावे म्हणून तेथील सरकारवर जनतेकडून दबाव आणला जात आहे. फिनलंड आणि रशिया यांच्यात १ हजार ३०० किलोमीटरची सीमारेषा असून सध्या काहीसा तणाव पाहायला मिळतो.
नाटो, अमेरिकाही उत्सुक
‘नाटो’चे सरचिटणीस जनरल जेन्स स्तोल्तेनबर्ग यांनी स्वीडन आणि फिनलंड यांना संघटनेचे सदस्यत्व मिळावे म्हणून त्याबाबतची प्रक्रिया जलदगतीने सुरू करण्यात येईल असे म्हटले आहे. अमेरिकेने देखील या दोन्ही देशांना ‘नाटो’चे सदस्य होण्यासाठी पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘‘ फिनलंडचा निर्णय हा त्यांच्या परराष्ट्र धोरणातील क्रांतिकारी बदल म्हणावा लागेल. यामुळे उभय देशांतील संबंध बिघडू शकतात तसेच उत्तर युरोपातील स्थैर्य आणि सुरक्षितताही संकटात सापडू शकते. सुरक्षेला निर्माण झालेले संकट दूर करण्यासाठी रशियादेखील कठोर पावले उचलेल.’’
ब्रिटनकडून रशियावर टीका
पूर्व युक्रेनमध्ये सेव्हेरोदोनेतस्क या भागाजवळची नदी ओलांडण्यात रशियाच्या फौजा अपयशी ठरल्याचे ब्रिटनने म्हटले आहे. या भागातील संघर्षाची काही छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली असून त्यामुळे शेकडो रणगाडे जळालेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. लुहान्स्क भागामध्ये असलेला एक पूल देखील युक्रेनच्या फौजांनी उद्ध्वस्त केला आहे.
रशियन सैनिकावर खटला
किव्ह ः एका युक्रेनी नागरिकाला ठार मारल्याप्रकरणी रशियाच्या सैनिकावर आज युक्रेनमध्ये खटला भरला आहे. युद्ध गुन्ह्याशी संबंधित हा पहिला खटला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संशयित रशियन सैनिकाला काचेच्या पिंजऱ्यामध्येच उभे करण्यात आले होते. सार्जंट वादिम शायशीमरिन (वय २१) असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर एका वृद्धाला ठार मारण्याचा आरोप आहे.c
Web Title: Russia Aggression On Finland Nato Membership We Will Answer In The Same Way Moscow
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..