चीन आणि पाकिस्तानला मोठा धक्का; रशिया भारताच्या बाजूने

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

संयुक्त राष्ट्रांमध्ये जम्मू-काश्‍मीरच्या मुद्द्यावर बोलविलेल्या बैठकीत भारताचा जुना मित्र रशिया पुन्हा एकदा पाठिशी उभा राहिला. जम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न हा द्विपक्षीय असल्याचे सांगत चीनच्या भूमिकेला रशियाने विरोध केला.

न्यूयॉर्क ः संयुक्त राष्ट्रांमध्ये जम्मू-काश्‍मीरच्या मुद्द्यावर बोलविलेल्या बैठकीत भारताचा जुना मित्र रशिया पुन्हा एकदा पाठिशी उभा राहिला. जम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न हा द्विपक्षीय असल्याचे सांगत चीनच्या भूमिकेला रशियाने विरोध केला.

जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तानने कांगावा सुरू केला होता. तसेच या मुद्द्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चीनच्या अध्यक्षांशीही चर्चा केली होती. त्यानंतर चीनने हा प्रश्‍न संयुक्त राष्ट्रांमध्ये उपस्थित केला होता. त्याअनुसार आज संयुक्त राष्ट्रांमध्ये सुरक्षा समितीची बैठक बोलविण्यात आली होती. ही चर्चा बंद दाराआड झाली. या बैठकीला अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन, फ्रान्स हे पाच कायम सदस्य आणि बेल्जियम, आयव्हरी कोट, डॉमेनिक प्रजासत्ताक, इक्वेटोरियल गुएनी, जर्मनी, इंडोनेशिया, कुवेत, पेरू, पोलंड आणि द. आफ्रिका हे दहा अस्थायी सदस्य उपस्थित होते. भारत आणि पाकिस्तानचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित नव्हते. या चर्चेची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली नाही. 

बैठकीमध्ये चीनने पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळत जम्मू-काश्‍मीरमधील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. काश्‍मीरमधील स्थिती तणावपूर्व आणि धोकादायक आहे. भारताने एकतर्फी कोणतीही कारवाई करू नये, असा पवित्रा चीनने घेतला होता. बैठक संपल्यानंतर लगेचच चीनच्या राजदूतांनी हेच मुद्दे पुन्हा एकदा पत्रकारांशी बोलताना मांडले. 

भारताचा जुना मित्र पुन्हा एकदा भारताच्या पाठीशी उभा राहिला व चीनचे सर्व मुद्दे खोडून काढत जम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न द्विपक्षीय असल्याचे स्पष्ट केले. रशियाचे प्रतिनिधी दिमित्री पोलयान्स्की याबाबत म्हणाले, ""जम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न द्विपक्षीय आहे या आमच्या भूमिकेत काहीही बदल झालेला नाही. आज केवळ परिस्थिती व एकमेकांची मते समजून घेण्यासाठी बैठक होती. ही सर्वसाधारण प्रक्रिया आहे.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Russia backs India as China takes Pakistani line at UN