-14 डिग्रीच्या पाण्यात बुडाले रशियाचे राष्ट्राध्यक्ष; व्लादिमीर पुतीन यांची बर्फाळ पाण्यात डुबकी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 January 2021

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी काल मंगळवारी -14 डिग्री सेल्सियल तापमानाच्या बर्फाळ पाण्यात डुबकी घेतली आहे.

मॉस्को: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी काल मंगळवारी -14 डिग्री सेल्सियल तापमानाच्या बर्फाळ पाण्यात डुबकी घेतली आहे. हा त्यांच्या धार्मिक कृतीचा भाग होता. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी फीस्ट डे म्हणजेच इपिफनीच्या निमित्ताने ख्रिश्चन धर्माच्या रुढीनुसार मॉस्कोमधील बर्फाळ पाण्यातील पूलमध्ये डुबकी घेतली आहे. या घटनेचा फोटो पुतिन यांच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. रशियामध्ये इपिफनीच्या निमित्ताने बर्फाळ पाण्यात डुबकी घेणं पवित्र मानलं जातं.

ख्रिश्चन धर्मातील पवित्र पर्व म्हणून ओळखलं जाणाऱ्या इफिफनीच्या दिवशी ख्रिश्चन धर्मीय लोक बर्फाळ पाण्यात आस्थेची डुबकी घेतात. 68 वर्षाच्या पुतिन यांनी देखील या परंपरेनुसार डुबकी घेतली आहे. इपिफनीच्या निमित्ताने ख्रिश्चन धर्मीय लोक पारंपारिक प्रथेनुसार कोणत्याही बर्फाळ पाण्याच्या नदीत, तलावात अथवा पूलमध्ये डुबकी घेतात.

हेही वाचा - 'शर्यत अजून संपली नाही कारण...'; ट्रम्प स्थापणार 'राष्ट्रभक्त' नावाचा नवा पक्ष?

याबाबतचा फोटो पुतिन यांच्या ट्विटर हँडलवर आहे. या फोटोमध्ये दिसतंय की, ते चारही बाजूंनी बर्फाच्या पाण्याने वेढलेले आहेत. अंगावर कपडे नसणाऱ्या पुतिन यांनी आस्थेने ही डुबकी घेतलेली दिसून येतेय. याबाबतचा व्हिडीओ देखील प्रसारित झाला आहे. या फोटोत ते एकदम फिट दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांच्या खराब तब्येतीबाबतच्या बातम्यांना लगाम बसतोय.

असं म्हटलं जातं की, ईसा मसीह यांनी जॉर्डन नदीमध्ये डुबकी घेतली होती. या दिवशी बर्फाळ पाण्यात डुबकी घेतल्याने पाप नष्ट होतात. ख्रिश्चन धर्मीय लोक असं मानतात की, मध्य रात्रीला या दिवशी नदी, तलाव अथवा पूलातील पाणी पवित्र होतं. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा या डुबकीचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोला तीन हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच सातशेहून अधिक रिट्विट देखील मिळाले आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Russian President Vladimir Putin took a traditional dip to mark Epiphany