सौदी अरेबिया कालवा खोदण्याच्या तयारीत  

वृत्तसंस्था
रविवार, 2 सप्टेंबर 2018

रियाध (वृत्तसंस्था) : आखाती देशांतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्‍यता असून, सौदी अरेबिया समुद्रामध्ये एक वेगळा कालवा खोदण्याच्या तयारीत आहे. यामुळे कतारला केवळ एका बेटाचे रूप येईल. सौदी राजघराण्याशी संबंधित एका अधिकाऱ्यानेच तसे सूतोवाच केले आहे. 

रियाध (वृत्तसंस्था) : आखाती देशांतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्‍यता असून, सौदी अरेबिया समुद्रामध्ये एक वेगळा कालवा खोदण्याच्या तयारीत आहे. यामुळे कतारला केवळ एका बेटाचे रूप येईल. सौदी राजघराण्याशी संबंधित एका अधिकाऱ्यानेच तसे सूतोवाच केले आहे. 

"सलवा आयलंड प्रकल्पाची अंमलबजावणी होण्याची मी आतुरतेने वाट पाहतो आहे, या प्रकल्पामुळे आखाती देशांचा भूगोलच बदलणार असून हा ऐतिहासिकदृष्ट्या सर्वांत मोठा प्रकल्प असल्याचे,'' सौदीचे राजे महंमद बिन सलमान यांचे ज्येष्ठ सल्लागार सौद-अल-खतानी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या प्रकल्पामुळे कतार सौदी अरेबियापासून पूर्णपणे विभक्त होणार आहे. मागील चौदा महिन्यांपासून येथील भूभागावरून सौदी अरेबिया आणि कतारमध्ये संघर्ष पेटला आहे. 

अन्य देशांचा आरोप 
सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, बहारिन आणि इजिप्त या देशांनी कतारसोबतचे व्यापारी आणि राजनैतिक संबंध 2017 मध्ये तोडून टाकले आहेत. कतार दहशतवादाला समर्थन करण्याबरोबरच सौदीचा कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या इराणसोबतही त्याचे साटेलोट असल्याचा ठपका अन्य देशांनी ठेवला आहे. 

प्रकल्पाची व्याप्ती 
मध्यंतरी सौदी सरकारच्या एका संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले होते, की आमचे सरकार 60 किलोमीटर लांब आणि दोनशे मीटर रुंद कालवा खोदण्याच्या तयारीत आहे. यामुळे कतार आणि सौदी अरेबिया पूर्णपणे वेगळे होतील. या प्रकल्पावर 2.8 अब्ज रियाल्स खर्च केले जाणार असून, हा कालवा आण्विक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी राखून ठेवला जाईल. 

निविदा मागविल्या 
या प्रकल्पासाठी पाच बड्या कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या असून, ज्या कंपनीला या प्रकल्पाचे काम देण्यात येईल तिचे नाव सप्टेंबर महिन्यामध्ये जाहीर केले जाणार आहे. सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी मात्र या प्रकल्पावर भाष्य करणे टाळले आहे. मागील वर्षी कतारला सौदीने सीमावर्ती भागातील भूभाग वापरण्यास मज्जाव केला होता; तसेच त्याच्या विमानाच्या उड्डाणांवरही निर्बंध घातले होते. याचवेळी अन्य आखाती देशांनी कतारमधील नागरिकांची हकालपट्टी केली होती. या वादात कुवैत आणि अमेरिकेने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता; पण तोही निष्फळ ठरला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saudi Arabia is preparing to dig its canal