कोरोना संसर्गाची दुसऱ्यांदा बाधा शक्य; पुरावा मिळाल्याचा शास्त्रज्ञांचा दावा 

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 25 August 2020

एकाच व्यक्तीला कोरोना विषाणूचा दुसऱ्यांदा संसर्ग झाल्याचा पुरावा मिळाल्याचा दावा हाँगकाँग विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केला आहे.

हाँगकाँग-  एकाच व्यक्तीला कोरोना विषाणूचा दुसऱ्यांदा संसर्ग झाल्याचा पुरावा मिळाल्याचा दावा हाँगकाँग विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केला आहे. एकदा संसर्ग झाल्यावर पुन्हा विषाणूची लागण होते का, या मुद्यावर शास्त्रज्ञांचे दुमत असून अद्यापपर्यंत ठामपणे कोणतीही बाजू मांडता आलेली नाही. या पार्श्वभूमीवर हा पुरावा मिळाला आहे. 

प्रशांत भूषण प्रकरणी सुनावणीला न्यायाधीशांनी दर्शवली असमर्थता

ऑगस्टच्या सुरुवातीला स्पेनमधून हाँगकाँगला आलेल्या एका ३३ वर्षांच्या युवकाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. या विषाणूचे जनुकीय पृथक्करण केले असता, हा विषाणूचा प्रकार याच व्यक्तीला मार्चमध्ये झालेल्या संसर्गातील विषाणूपेक्षा वेगळा असल्याचे आढळून आले आहे. या युवकाला पहिल्या संसर्गावेळी सौम्य लक्षणे जाणवत होती आणि आता काहीच लक्षणे जाणवत नाहीत. हा युवक स्पेनहून परतल्यावर हाँगकाँग विमानतळावर त्याची चाचणी घेतली असता तो बाधित झाल्याचे समजले.

शिबू सोरेन यांना रांचीतून गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात हलवणार

यावरून, काही व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या तरी त्यांच्यात निर्माण झालेली प्रतिकारशक्ती कायमस्वरूपी टिकत नाही, हे सिद्ध झाले असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. किती जणांना कोरोनाचा पुन्हा संसर्ग झाला असेल, याचा अंदाज नाही. कदाचित ही संख्या मोठीही असेल, असा अंदाज हाँगकाँग विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. केल्विन केवँग तो यांनी व्यक्त केला. 

या प्रकारची आणखी उदाहरणे नसल्याने दुसऱ्यांदा संसर्ग झाल्यास काय परिणाम होतो, रोगाची तीव्रता अधिक असते की कमी, आयुष्याला धोका उद्‌भवतो की नाही, याबाबत अभ्यास झालेला नाही, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Second chance of corona infection Scientists claim to have found evidence