दक्षिण चीन समुद्रातील वादावर शांततापूर्ण तोडगा हवा : उपराष्ट्रपती

निरंजन आगाशे
शनिवार, 11 मे 2019

दक्षिण चीन समुद्रातील वादांवर शांततापूर्ण आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या चौकटीतच तोडगा काढला जावा, या भारताच्या भूमिकेचा उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी पुनरुच्चार केला.

हनोई, (व्हिएतनाम) : दक्षिण चीन समुद्रातील वादांवर शांततापूर्ण आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या चौकटीतच तोडगा काढला जावा, या भारताच्या भूमिकेचा उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी पुनरुच्चार केला. भारताने या विषयात घेतलेल्या भूमिकेशी व्हिएतनाम सहमत असल्याचे त्या देशाच्या उपाध्यक्षा श्रीमती डांग थी गॉक थिन यांनी स्पष्ट केले. दोन्ही नेत्यांत आज द्विपक्षीय संबंधांविषयी विस्तृत चर्चा झाली. त्यात सुरक्षा व व्यूहनीतीविषयक मुद्द्यांबरोबरच दोन्ही देशांमधील लोकांचे विविध क्षेत्रांतील आदानप्रदान वाढविण्याच्या मुद्द्यावर भर देण्यात आला.

येथील भव्य व ऐतिहासिक अध्यक्षीय प्रासादात झालेल्या द्विपक्षीय चर्चेची माहिती देताना चीनचा थेट उल्लेख न करता उपराष्ट्रपती म्हणाले, ""दक्षिण चीन समुद्रात आंतरराष्ट्रीय संकेत आणि आचारसंहितेचे पालन करण्याविषयी संबंधित देशांमध्ये सहमती होईल, अशी आम्हाला आशा वाटते.'' भारताच्या अक्‍ट ईस्ट पॉलिसीत व्हिएतनामला असलेले महत्त्व नायडू यांनी अधोरेखित केले. त्यादृष्टीने व्यापारवाढीच्या उद्दिष्टाबरोबरच विविध क्षेत्रांतील परस्परसहकार्य वाढविण्यावरही दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली. 

गेल्या तीन वर्षांत भारत व व्हिएतनाम यांच्यातील व्यापार जवळजवळ दुपटीने वाढला आहे. 2016 मध्ये 7.8 अब्ज डॉलरवरून तो आता 14 अब्ज डॉलरवर गेला आहे. तो आणखी वाढविण्यात यावा, असे मत दोन्ही नेत्यांनी व्यक्त केले. भारतातून कोलकता ते हनोई थेट विमानसेवा लवकरच सुरू करणे, व्हिएतनामी विद्यार्थ्यांना एम. फील व पीएच. डी.साठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तींच्या संख्येत वाढ करणे, शेती क्षेत्रातील परस्परसहकार्य वाढविणे व दोन्ही देशांतील पयर्टनाला उत्तेजन देणे, अशा विविध प्रस्तावांवर भारताची भूमिका सकारात्मक असल्याचे नायडू यांनी स्पष्ट केले. 

"नव्या भारताच्या उभारणीत सहभागी व्हा'

व्हिएतनाममधील भारतीयांच्या वतीने गुरुवारी सायंकाळी आयोजित कायर्क्रमात बोलताना उपराष्ट्रपतींनी भारताच्या विकासयात्रेत व्हिएतनाममधील भारतीयांनीही सक्रिय सहभाग घ्यायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. येथे विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या प्रत्येक भारतीयाने आपण देशाचे राजदूत आहोत, असे समजून "नव्या भारता'च्या उभारणीच्या प्रयत्नात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Should have Peaceful Settlement on China Sea Dispute says M Venkaiah Naidu