एकेरी डोसच्या लशीची 60 हजार जणांवर चाचणी

वृत्तसंस्था
Friday, 25 September 2020

पहिल्या डोसनंतर तीन ते चार आठवड्यांनी दुसरा डोस घेण्याची गरज लागते. इतर लशींच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांच्या तुलनेत जॉन्सन अँड जॉन्सनच्या चाचणीची व्याप्ती दुप्पट असेल.

वॉशिंग्टन - जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी कोरानावर बनवीत असलेल्या एकेरी डोसच्या लशीची चाचणी 60 हजार व्यक्तींवर घेण्यात येईल. 

अध्यक्षीय निवडणूकीपूर्वी लस आणण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कंबर कसली आहे. विविध लशींच्या तंत्रज्ञानासाठी अमेरिकी सरकारकडून अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करण्यात आली आहे. अमेरिकेत तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्या सुरू झालेली ही चौथी लस आहे, पण एकेरी डोसचे स्वरूप असलेली पहिलीच लस आहे. या चाचणीतून लशीची सुरक्षितता आणि परिणामकारकता स्पष्ट होईल. इतर लशींचे स्वरूप दोन डोसचे आहे. पहिल्या डोसनंतर तीन ते चार आठवड्यांनी दुसरा डोस घेण्याची गरज लागते. इतर लशींच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांच्या तुलनेत जॉन्सन अँड जॉन्सनच्या चाचणीची व्याप्ती दुप्पट असेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर तसे नियोजन करण्यात आले आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लशीची वैशिष्ट्ये

  • जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची शाखा असलेल्या जान्सेन फार्मास्युटीकलतर्फे निर्मिती
  • बोस्टनमधील बेथ इस्राइल डीकॉनेस वैद्यकीय केंद्रातील विषाणुशास्त्र आणि लस संशोधन केंद्राच्या साथीत संशोधन प्रक्रिया
  • द्रव स्वरूपातील लशीचा फ्रीजमध्ये तीन महिन्यांपर्यंत साठा करणे शक्य
  • इतर दोन लशींच्या तुलनेत  ही महत्त्वाची बाब इतर दोन लशींचा साठा द्रव गोठवलेल्या स्वरूपात किंवा अतीथंड तापमानात करणे अनिवार्य
  • जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीच्या संशोधनासाठी सुमारे दीड अब्ज डॉलरचा निधी
  • 100 दशलक्ष (10 कोटी) डोसची अगाऊ खरेदी

लशीचा शास्त्रीय भाग
जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीसाठी रोगास कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूंना रासायनिक प्रक्रियेद्वारे कमकुवत करून त्यांचा वापर करण्यात आला आहे. धोका नसलेल्या अशा विषाणूंना जनुकामध्ये सोडले जाते. हे जनुक कोरोना विषाणूच्या वैशिष्ट्यपूर्ण भागाशी साधर्म्य दर्शविणारे असते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशातील लोकांचे वैविध्य
कोविड-19 प्रतिबंध यंत्रणा राबवण्यासाठी त्यातील सामुदायिक सहभागाचे समन्वय मिशेल आंद्रासिक यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, चाचण्यांमधील सहभागी स्वयंसेवकांमध्ये आमच्या देशातील लोकांचे वैविध्य परावर्तित होण्याची गरज आहे. लस प्रत्येकासाठी परिणामकारक ठरावी म्हणून शक्य तेवढ्या प्रकारचे लोक सहभागी होणे आवश्यक आहे. चाचण्यांची व्याप्ती वाढल्यास आकडेवारी वाढते आणि पर्यायाने सुरक्षिततेचे प्रमाणही वाढते.

तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांनंतर वर्षाअखेरपर्यंत आमच्याकडे पुरेशी आकडेवारी असेल. त्या आधारावर पुढील वर्षी एक अब्ज डोसचे उत्पादन करण्याची कंपनीची योजना आहे.
- पॉल स्टोफेल्स, कंपनीचे मुख्य शास्त्रीय अधिकारी

अमेरिकेतील कोरोना मृतांचा सुमारे दोन लाखाच्या पलीकडे गेला आहे. अशावेळी  सुरक्षितता किंवा परिणामकराकतेशी तडजोड न करता प्रत्येक गोष्टी करावी लागेल. त्यादृष्टिने लशींचे संशोधन वैविध्यपूर्ण पद्धतीने होणे चांगली बाब आहे. जागतिक परिस्थिती पाहता ते महत्त्वाचे आहे.
- फ्रान्सिस कॉलीन्स,  राष्ट्रीय आरोग्य संस्थेचे संचालक

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एकेरी डोसची लश सुरक्षित आणि परिणाम-कारक ठरल्यास जागतिक पातळीवरील साथ आटोक्यात आणण्यासाठी लक्षणीय फायदा होऊ शकेल.
- डॅन बॅरौच,  बोस्टन केंद्राचे संचालक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: single-dose vaccine developed by Johnson & Johnson Company on the corana will be tested on 60000 people