चीन-बांगलादेश मैत्री मजबूत; शी जिनपींग यांची भागीदारीची साद

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 4 October 2020

चीनने व्युहात्मक भागीदारी तसेच प्रकल्पांना चालना देण्यासाठी बांगलादेशला साद घातली आहे

बीजिंग- चीनने व्युहात्मक भागीदारी तसेच प्रकल्पांना चालना देण्यासाठी बांगलादेशला साद घातली आहे. उभय देशांमधील राजनैतिक संबंधांच्या 45व्या वर्धापनदिनाचा मुहूर्त चीनने साधला आहे.

चीनचे शी जीनपिंग आणि बांगलादेशचे अब्दुल हमीद हे उभय अध्यक्ष तसेच ली केक्वियांग आणि शेख हसीना या उभय पंतप्रधानांनी शुभेच्छा संदेशांची देवाणघेवाण केली. बांगलादेशने बेल्ट अँड रोड इनिशिएटीव (बीआरआय) या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला चालना द्यावी अशी चीनची अपेक्षा आहे. या उपक्रमाअंतर्गत विविध प्रकल्प तसेच वाहतूक मार्गांची बांधणी केली जाते. त्यादृष्टिने आपले धोरण पूरक बनविण्याची चीनची तयारी आहे. याद्वारे व्युहात्मक संबंध नव्या उंचीवर नेण्यास चीन उत्सुक आहे. झिन्हुआ या चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.

सात महिन्यानंतर पुन्हा सुरु होणार मक्का; 'उम्राह' यात्रेसाठी मशीद खुली

कोरोनामुळे नवा अध्याय

उभय देशांनी अनुकूल तसेच प्रतिकूल काळात एकमेकांना साथ दिली असून कोरोना संकटाच्या काळात एकमेकांची मदत करीत खांद्याला खांदा लावून या साथीचा मुकाबला केला. त्यामुळे द्विपक्षीय संबंधांमध्ये मैत्रीचा नवा अध्याय लिहिला गेला आहे, असेही जिनपींग यांनी म्हटले आहे.
केक्वियांग यांनी सांगितले की, विविध क्षेत्रांत बांगलादेशबरोबरील सहकार्य आणखी वाढविण्यास आणि प्रगतीला चालना देण्यास आम्ही उत्सुक आहोत
शेख हसीना यांनी सांगितले की, बांगलादेशच्या सामाजिक-आर्थिक विकासात चीन हा एक बहुमोल भागीदार राहिला आहे. कोरोना काळात चीनने मदत आणि पाठिंबा कायम ठेवला आहे. या मदतीला आम्ही दाद देतो.

भारताचे बारकाईने लक्ष

अलिकडच्या काळात बांगलादेश हा चीनचा विकासातील सर्वांत मोठा भागीदार ठरला आहे. अनेक पायाभूत प्रकल्पांसाठी चीनने निधी ओतला असून या घडामोडींवर भारत बारकाईने लक्ष ठेवेल.

कोरोना रुग्णालयातूनही ट्रम्प करु शकतात जगाचा विनाश; काय आहे 'फुटबॉल'?

चीन-बांगलादेश युती

- ढाकास्थित फायनान्शियल एक्स्प्रेसनुसार नऊ नव्या प्रकल्पांसाठी बांगलादेशची चीनकडे निधीची मागणी
- एकूण किंमत 6.4 अब्ज डॉलर
- नवे बंदर आणि पुलाचा समावेश
- शी जिनपिंग यांच्या 2016 मधील ढाका दौऱ्यात 25 अब्ज डॉलर खर्चाच्या अनेक पायाभूत प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी करारावर स्वाक्षऱ्या
- ऑक्टोबर 2016 मधील स्थितीनुसार उभय देशांत 27 करार, ज्याची किंमत 24 अब्ज डॉलर
- त्याचवेळी उभय देशांच्या कंपन्यांमध्ये 13 संयुक्त प्रकल्प, ज्याची किंमत 13.6 अब्ज डॉलर

चीन-बांगलादेश यांच्यातील मैत्रीचा इतिहास प्रदिर्घ असून काळाच्या ओघात ती नेहमीच नवी राहिली आहे. दोन्ही देशांना एकमेकांचा नेहमीच आदर केला असून समान वर्तणूक दिली आहे. त्यामुळे राजकीय विश्वास दृढ झाला आहे. परस्परपूरक सहकार्यामुळे उभय देशांच्या जनतेला फायदा झाला आहे, असं चीनचे अध्यक्ष शी जिनपींग म्हणाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sino-Bangladesh friendship on next level Xi Jinping call for partnership