दक्षिण कोरिया अध्यक्षांनी मागितली जनतेची माफी; अपयशी ठरल्याची दिली कबुली

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 28 September 2020

सागरी महामंडळाचा हा अधिकारी उत्तर कोरियाच्या सैनिकांच्या गोळीबारात मारला गेला.

सोल- सरकारी अधिकाऱ्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी पार पाडण्यात आपले सरकार अपयशी ठरले अशी कबुली देत दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मुन जाइ-इन यांनी यांनी सोमवारी जनतेची माफी मागितली.

सागरी महामंडळाचा हा अधिकारी उत्तर कोरियाच्या सैनिकांच्या गोळीबारात मारला गेला. त्याचा मृतदेह उत्तर कोरियाच्या सागरी हद्दीत पाण्यावर तरंगताना दिसत होता. तो ताब्यात घेण्यासाठी अनेक तासांचा बहुमोल वेळ वाया घालवल्याबद्दल सरकारवर टीका होत असून नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. मारला जाण्यापूर्वी सहा तास बाकी असताना हा अधिकारी उत्तर कोरियाच्या सागरी हद्दीत दिसला होता, असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यानंतरही सरकारने पावले उचलली नाहीत असा आरोप टीकाकार तसेच काही खासदारांनी केला आहे.

भाजपने केले काँग्रेसला 'फॉलो'; 'लूझर्स लक', अपयशी नेत्यांना...

उत्तर कोरियाने संवादाचे सर्व मार्ग बंद केल्यामुळे संपर्क साधणे अवघड होते. त्या अधिकाऱ्याच्या बाबतीत उत्तर कोरिया काय करू शकते याविषयी गुप्तचरांनी दिलेल्या माहितीचा आढावा घेण्यास जास्त वेळ लागला, असा खुलासा दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.

या प्रकरणानंतर उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाची माफी मागण्याची दुर्मीळ घटना घडली. त्याचवेळी उत्तर कोरियाने सारा दोष संबंधित अधिकाऱ्याच दिला आहे. ओळख तसेच इतर प्रश्न विचारले असता त्याने उत्तरे दिली नाहीत आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्यावर गोळ्या झाडणे भाग पडले असा दावा उत्तर कोरियाने केला आहे. त्यानंतर रविवारी दक्षिणकोरियाला बजावण्यात आले. आपल्या सागरी हद्दीत नौका पाठवू नयेत आणि त्याद्वारे तणाव निर्माण करू नये असा इशारा देण्यात आला. सागरी हद्दीच्या दक्षिणेकडील पाण्यातच आपण शोध मोहीम राबवीत असल्याचे दक्षिण कोरियाच्या लष्करी तसेच सागरी सुरक्षा दलांनी स्पष्ट केले आहे.

संजय राऊत यांचा ऑडिओ कोर्टात सादर; 'कंगनाचं नाव घेतलच नाही'

या पार्श्वभूमीवर मून यांनी वरिष्ठ सहकाऱ्यांसमवेत एक बैठक घेतली. मृत अधिकाऱ्याच्या कुटुंबियांविषयी त्यांनी सहानुभूती व्यक्त केली. सरकार कोणतीही सबब पुढे करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

किम यांनी मागितलेल्या माफीवरून ते उभय देशांमधील ठप्प झालेले संबंध पूर्ववत निर्माण करण्यास उत्सुक आहेत असे दिसते. उत्तर कोरियाने चर्चेला पुन्हा प्रारंभ करावा आणि जूनमध्ये बंद केलेला लष्कराच्या पातळीवरील संवाद पुर्ववत प्रस्थापित करावा, असेही मून पुढे म्हणाले.

या दुर्दैवी घटनेचा शेवट दुर्दैवी होऊ नये अशी आमची आशा आहे. त्यासाठी आम्ही संयुक्त चौकशीचा प्रस्ताव ठेवत आहोत. यातून उभय देशांमधील चर्चा आणि सहकार्याला वाव निर्माण होईल आणि दोन कोरियांमधील संबंध सुधारू शकतील, मुन जाइ-इन म्हणाले आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: south Korea chief apologize people for his government failure