लक्षणे नसलेल्या मुलांपासूनही कोरोना संसर्गाचा फैलाव; अमेरिकी शास्त्रज्ञाचा दावा

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 12 September 2020

लक्षणे नसलेल्या किंवा किरकोळ लक्षणे असलेल्या मुलांपासूनही कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ शकतो, असा दावा अमेरिकी शास्त्रज्ञांनी केला आहे.

वॉशिंग्टन- लक्षणे नसलेल्या किंवा किरकोळ लक्षणे असलेल्या मुलांपासूनही कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ शकतो, असा दावा अमेरिकी शास्त्रज्ञांनी केला आहे. यासंदर्भात अभ्यासकांनी अमेरिकेच्या उटा राज्यात संशोधन केले आहे.

शास्त्रज्ञांच्या संशोधनातून रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये १२ जणांना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्या संपर्कात आल्याने १२ जणांना कोरोना झाल्याचे उघडकीस आले. यात त्यांच्या कुटुंबीयांतील काही जणांचाही समावेश होता. याबाबत संशोधकांनी अमेरिकेचे सेंटर फॉर डिसिज कंट्रोल ॲड प्रिव्हेंशनच्या अहवालात माहिती दिली आहे.

साल्ट लेक येथे एप्रिलपासून जुलैपर्यंत तीन मुलांच्या संपर्कात आलेल्या १८४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे लक्षणे नसलेल्या मुलांपासूनही कोरोना संसंर्ग पसरु शकतो, अशी शक्यता वर्तविली आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण बैठकीत नुकताच कोरोनावर एक प्रस्ताव मंजूर झाला असून त्यात संयुक्त राष्ट्राच्या इतिहासात कोरोना संकट हे सर्वात मोठे जागतिक संकट असल्याचे म्हटले आहे. या प्रस्तावात महामारीमुळे जगावर झालेल्या व्यापक परिणामावर चिंता व्यक्त केली आहे. आरोग्य, शिक्षण, गरीबी आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाल्याचे म्हटले आहे.

कॅनाडाला जमलं! गेल्या 24 तासांत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही

फ्रान्समध्ये पुन्हा लॉकडाउन नाही

फ्रान्समध्ये गेल्या चोवीस तासात ९ हजाराहून अधिक बाधित रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत देशात ३ लाख ६३ हजार ३५० जणांना बाधा झाली आहे. यात ३० हजार ८९३ जणांचा मृत्यू झाला आहे. अर्थात पंतप्रधान ज्या कास्ते यांनी देशात पुन्हा लॉकडाउन लागू केले जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यांनी बाधितांचा क्वारंटाइनचा कालावधी हा १४ दिवसांहून ७ दिवस करण्याची घोषणा केली आहे. अर्थात चाचणी आणि संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याच्या कामात वेग आणला जाईल, असे नमूद केले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Spread of corona infection even from children without symptoms American scientist claims