चीनमधील विदेशी नागरिकांची मायदेशी रवानगी

चीनमधील विदेशी नागरिकांची मायदेशी रवानगी

बळींची संख्या १३२; लागण झालेल्यांची संख्या सहा हजार
बीजिंग - चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे मरण पावलेल्यांची संख्या बुधवारी १३२ वर पोचली. या विषाणूची लागल झालेले नवे दीड हजार रुग्ण आढळले असून त्यांची संख्या सहा हजारांपर्यंत पोचली आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार ज्या वुहान शहरातून झाला तेथील विदेशी नागरिकांना त्यांच्या देशाने माघारी बोलविले आहे. यात जपान, अमेरिका यांचा समावेश आहे. 

आजाराचा प्रसार रोखण्यासाठी अगदी शेवटचा उपाय म्हणजे चीन- अमेरिका विमानसेवा बंद ठेवावा का, याचा विचार अमेरिका करीत असली तरी सध्या तसा निर्णय घेण्यात येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या संसर्गजन्य रोग अमेरिकेत पसरू नये म्हणून सर्व प्रकारच्या उपायांवर विचार सुरू असून यात प्रवासावर निर्बंध आणण्याचाही पर्याय आहे, असे अमेरिकेचे आरोग्य मंत्री अलेक्‍स अझर यांनी सांगितले. कोरोना व्हायरसच्या भीतीने चीनला जाणाऱ्या विमानांच्या संख्या अनेक देशांनी कमी केली आहे. जागतिक पातळीवरील कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना चीनमध्ये प्रवास न करण्याची सूचना दिली आहे. या आजाराचा धोका वाढत असल्याने खाणीपासून चैनीच्या वस्तू उत्पादन क्षेत्राला झळ पोचली आहे. 

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या फ्लूसारख्या विषाणूंमुळे बळी पडलेलेल्यांची संख्या कालपेक्षा २६ ने वाढून ती आज १३२ झाली. मृत्यू झालेले बहुतेक रुग्ण हे चीनमधील हुबेई प्रांतातील आहेत. या आजाराची लागण झालेल्यांची संख्या एक हजार ४५९ ने वाढून ती पाच हजार ९७४ झाली आहे. ‘सार्स’ (सिव्हर ॲक्‍युट रेस्पिरेटरी सिंड्रोम) कोरोना व्हायरसमुळे जगभरात २००२-२००३ या काळात मृत्यू झालेल्यांची संख्या सुमारे ८०० आहे. सध्या चीनमध्ये पसरलेला आजार हा ‘सार्स’एवढा धोकादायक नाही. मात्र हा आजार वेगाने पसरत असल्याने आणि त्यामुळे होणारी प्राणहानी तसेच लक्षणे दिसण्यापूर्वीच त्याचा संसर्ग होतो का, याची फारशी माहिती उपलब्ध नसल्याने तो घातक ठरत आहे, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जगभरात दक्षता
    वुहानमधून २०६ जपानी नागरिक खासगी विमानाने आज टोकियोला पोचले
    आजारी असलेले पाच जपानी नागरिक रुग्णालयात दाखल. पण विषाणूंचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले नाही
    अमेरिकेच्या नागरिकांना व वकिलातीमधील कर्मचाऱ्यांना आणण्यासाठी खासगी विमान वुहानला सकाळी पोचले
    ऑस्ट्रेलियन नागरिकांनी हुबेई सोडल्यानंतर ख्रिसमस बेटावर त्यांना वेगळे ठेवण्याचा  ऑस्ट्रेलियाचा निर्णय
    ब्रिटिश एअरवेजची चीनमधील विमानसेवा स्थगित
    चिनी पर्यटकांना युरोपला घेऊन जाणारी रशियाची 
उरल एअरलाईन्सची काही विमाने रद्द
    आजाराची लागण झालेले नवे रुग्ण जर्मनीत आढळले
    केरळमध्ये ८०६ नागरिक निरीक्षणाखाली
    इंडिगा, एअर इंडियाने चिनमध्ये जाणारी काही विमाने रद्द केली. 
    विमान कर्मचाऱ्यांना ‘एन-९५’ मास्क लावण्याचे निर्देश 

‘यूएई’मध्ये पहिला रुग्ण
संयुक्त अरब अमिराती (यूएई) मधील एका कुटुंबाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. हे कुटुंब वुहानमधून आले असल्याचे तेथील आरोग्य आणि प्रतिबंध मंत्रालयातर्फे सांगण्यात आले. या कुटुंबातील किती जणांना या विषाणूचा संसर्ग झाला हे त्यांनी स्पष्ट केले नाही. कोरोना व्हायरसचा पश्‍चिम आशियात प्रसार झाल्याची ही पहिलीच घटना आहे. या कुटुंबातील सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवले असल्याचे मंत्रालयाने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com